पान:वनस्पतिविचार.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

पिंक, कारनेशन, वगैरे फुलांत पाकळ्यास लांब देठ असून हें देंठ सांकळ्यानी आच्छादित असतात. येथे पाकळ्या चारीच्या ऐवजी पांच असून त्यास व्यवस्थित साकार असतो.

 जंगली गुलाब, स्ट्राबेरी, कापूस, सफरचंद वगैरे फुलांत पाकळ्या पांच असून त्यांचा एकंदर आकार व्यवस्थित असतो. पिंक-फुलाप्रमाणे पांकळ्यास येथे देठ असत नाही.

 सुट्या अव्यवस्थित पाकळ्यासही पुष्कळ प्रकारचे आकार आले असतात. विशेषेकरून डाळीवर्गातील फुलें लक्षात ठेविण्यासारखी असतात. मागे सांगितलेच आहे की, त्यांस पांच पाकळ्या असतात. पैकी एक मोठी पाकळी जिभेसारखी उलटी लोंबती राहून दोन पंखाकृति असतात, व उरलेल्या दोन परस्पर एकमेकांस चिकटून लहान नांवेप्रमाणे त्यास आकार येतो.

 संयुक्त पाकळ्यासही संयोगाप्रमाणे वेगवेगळे आकार येतात. शिवाय संयुक्त स्थितीत सुद्धा पाकळ्या व्यवस्थित असतात. जसे, भोंपळा वगैरे फुलांतील पाकळ्या संयुक्त असून त्यांची एक व्यवस्थित नळी असते. सूर्यकमळाची लहान लहान फुले ह्याच प्रकारची असतात. भोंवरी, भोंपळा, दोडका वगैरे फुलांत पाकळ्या संयुक्त झाल्यामुळे त्यास बैलाचे गळ्यांतील घंटेप्रमाणे आकार येतो. धोतऱ्याचे फूल लांबट असून तोंड रुंद असते म्हणून त्यास तेल ओतण्याकरितां बनविलेल्या नाळक्यासारखी आकृती येते. सदाफुली, कुंद, वगैरेमध्ये पांकळ्या चक्राकृति असतात.

 तुळस, सब्जा, कपुरी, वगैरे फुलांत पाकळ्या संयुक्त जरी असल्या तथापि त्यास व्यवस्थित आकार येत नाही. त्यांचा आकार ओष्ठाकृति असतो. असल्या फुलांचा एक स्वतंत्रवर्ग प्रसिद्ध आहे. सूर्यकमलांतील अथवा झेंडू झिनिया वगैरे मध्ये जी बाह्यांगाकडे फुले असतात, त्यांच्या पाकळ्या संयुक्त होऊन वरील बाजूस लोंबत्या तुकड्याप्रमाणे दिसतात.

 याशिवाय शेकडों संयुक्त तसेच सुट्या पाकळ्यास आकार आले असतात, त्या सर्वांचे वर्णन करणे अशक्य आहे. नेहमी पाहण्यात येणाऱ्या फुलांचेच परिक्षण केले आहे.