पान:वनस्पतिविचार.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१७ वे ].    जननेंद्रियें-फुलें.    १४७
-----

भाग करितां येतात. कारण प्रत्येक दलाचा आकार तसेच संख्या हीं सारखी सारखी असतात. निरनिराळ्या कारणांनी वर्तुलदलांत फरक होत जाऊन वेगवेगळ्या आकाराची फुले तयार होतात. अव्यवस्थित फुलांत सारखे दोन भाग वाटेल त्या ठिकाणी करितां येणार नाहींत.

 द्विदलधान्य तसेच एकदलधान्य वनस्पतींत फुले वेगवेगळ्या प्रकारची असतात. बाह्य आकारांत फारसा फरक नसून फुलांच्या वर्तुलदलांच्या संख्येत फेरबदल असतो. द्विदलधान्यवनस्पतींत वर्तुलदले चार किंवा पांच असतात. दलें अधिक असली तर चार अथवा पांच संख्येचे गुणोत्तर झाले असते. एकदल वनस्पतीमध्ये दलांची संख्या तीन अथवा तिन्हीचे गुणोत्तर असते. ह्यामुळे कोणतेही फूल वर्तुलदलांची संख्या मोजून एकदलवनस्पतीपैकी आहे किंवा द्विदल वनस्पतीपैकी आहे, हे सहज ओळखता येणार आहे. गुलछबु, कांदा, लसुण, केळी, तरवार, नाकदवणा, गहूं, जोंधळा, वगैरेची फुलें तपासून वरील गोष्टीची सत्यता पहावी. ही फुलें एकदलवनस्पतीची आहेत. तसेच कापूस वाटाणा, मूग, तूर, अंबाडी, गुलाब, वगैरे फुलें द्विदलवर्गापैकी असून प्रत्येक वर्तुलांत दलांची संख्या पांच पांच आढळते.

 साधारणपणे फुलामध्ये चार वर्तुळे असतात. पण पुष्कळ वेळा एखाद्या वर्तुळाचा अभाव असतो. जसे भोपळा, कारली, दोडका वगैरे. कधी पहिले वर्तुळ नसते, तर कधी दुसरे वर्तुळ नसते. झेंडूच्या फुलांत पुष्पकोश नसतो. एरंडीच्या फुलांत पुष्पमुगुट नसतो. गहूं, जोंधळा, ओट वगैरेमध्ये दोन्ही बाह्य वर्तुळे नसतात. कांहीं फुलांत पुंकोश नसून बाकीची तीन वर्तुळे असतात. जसे भोंपळा, काकडी, वगैरे. अशा फुलांस केवल-स्त्रीकेसर फुलें म्हणतात, (Pistillate) व जेव्हां स्त्रीकोशाचा अभाव असून बाकीची वर्तुळे असतात, अशा वेळी त्या फुलास केवल-पुंकेसर फुलें (Staminate) म्हणतात. चारी वर्तुले असणाऱ्या फुलास पूर्ण (Complete) फुलें म्हणतात. तसेच जेव्हा वर्तुलाची दलें सारख्या आकाराची आढळतात, त्यास व्यवस्थित फुलें म्हणतात, जसे कापूस, लिली, वगैरे. पावट्याच्या पाकळ्या अव्यवस्थित असतात, विशेषे करून फुले व्यवस्थित किंवा अव्यवस्थित ठरविण्यास फुलांच्या पाकळ्या सारख्या आहेत किंवा नाही, हे पाहतात. नाहीं तर प्रत्येक वर्तुळ व्यवस्थित अथवा अव्यवस्थित आपआपल्या वर्तुळाकार मानाने म्हणता येईल.