पान:वनस्पतिविचार.pdf/173

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७ वे ].    जननेंद्रियें-फुलें.    १४५
-----

फुले ही वनस्पतीच्या सर्व अवयवामध्ये फार महत्त्वाची आहेत. कारण ती जननेंद्रिये असून त्यापासून पुढील वनस्पति अथवा बीज तयार होते. फूल ही संज्ञा जननेंद्रियास लावितात, उच्च वर्गातील फुलें विशिष्ट आकाराची असून त्यांची रचना क्षुद्र वर्गातील फुलांपेक्षा अगदी वेगळी असते. जी कल्पना उच्च वर्गातील फुलासंबंधीं करितां येईल, ती कल्पना सर्व प्रकारे क्षुद्र-वर्गात लागू पडत नाहीं. क्षुद्र-वर्गातील जननेंद्रियें अस्पष्ट असून निरनिराळ्या प्रकारची असतात. उच्च-वर्गातील फुलें रंगीत तसेच सुवासिक असतात. त्या फुलांत कांहीं विशिष्ट वर्तुळे असून, प्रत्येक वर्तुळाचे भाग स्पष्ट असतात. प्रत्येकाचा आकारही वेगळा असतो. फुलांस देंठ असुन फुलांची मांडणी विशिष्ट फांदीवर आढळते. क्षुद्र वर्गात फुलें पूर्णावस्थेस पोहोंचलीं नसतात. उच्च-वर्गाप्रमाणे गर्भ-संस्थापना झाल्यावर बीजोत्पादन होत नसते. शुद्र-वर्गात विशिष्ट भागांवर जनन-पेशी (Spore ) उत्पन्न होऊन त्यापासून वंशवर्धनं होते. स्त्रीपुरुषतत्वसंयोग शुद्र-वर्गातही आढळते. त्यापासून उच्च-वर्गात आढळणारें बीज तयार न होतां निराळ्या तऱ्हेचे बीज उत्पन्न होते. खरोखर स्त्रीपुरुष-संयोग होऊन उच्च-वर्गात तसेंच शुद्-वर्गात जें बीज उत्पन्न होते, त्यामध्ये तात्त्विकदृष्ट्या फरक नसतो. असो, तुर्त उच्च-वर्गीय फुलांचे वर्णन करून जागजागी शुद्र वर्गासंबंधानें उल्लेख करण्याचा विचार आहे.

 कोणतेही फूल बारकाईने तपासून पाहिले असता आपणांस त्यामध्ये चार वर्तुळे साधारणपणे आढळतात. पानाप्रमाणे फुलांसही देंठ असतो. कांहीं फुलांत देंठ नसतो. फुलांची पहिली दोन बाह्य वर्तुळे साधारणपणे पानासारखींच असतात. पानांच्या शिरा, आकार, कडा, अग्रे वगैरे गोष्टींत ती पानाशी साम्य पावतात. फुलांमध्ये निरनिराळे रंग आढळतात, इतके रंग पानांत सार्वत्रिक आढळत नाहींत. फुलांतील पहिल्या वर्तुळांत पानासारखा हिरवा रंग असतो. कधी कधी दुसऱ्या वर्तुळामध्येही पहिल्याप्रमाणे हिरवा रंग आढळतो. जसे, हिरवा चाफा, सिताफळ, रामफळ, वगैरे. अशा वेळी पहिल्या दोन्हीं वर्तुळांत एकच रंग असल्यामुळे दोन्ही वर्तुळे एकाच प्रकारची दिसतात. ही बाह्य वर्तुळे आतील नाजुक वर्तुळांचे संरक्षण करीत असतात. पहिल्या वर्तुळांस नेहमी आढळणाच्या हिरव्या रंगावरून हरितदलवर्तुल (Calyx) अथवा पुष्पकोश असे नांव पडले आहे. दुसऱ्या वर्तुळास पीतदल वर्तुळ अथवा पुष्पमुकुट ( Co-