पान:वनस्पतिविचार.pdf/172

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१४४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

तंतूंची साखळी जशी सर्व शरीरभर असते, तथापि त्यापासून विशिष्ट उत्तेजनात्मक ज्ञानाशिवाय इतर ज्ञान वनस्पतींस होत नसते. मज्जातंतूकडून पुष्कळ काम करून घेतले असतां तो जसा, थकून कामाला निरुपयोगी होतो; तद्तूच जीवनकण काही वेळ उत्तेजनास प्रत्युत्तर देतात, पण पुढे त्याकडून प्रत्युत्तर येत नाहीं, कांहीं वेळ विश्रांती मिळाली असतां पुनः ते ताजेतवाने होऊन पूर्वीप्रमाणे उत्तेजनास प्रत्युत्तर देण्यास योग्य होतात.

 इतक्या गोष्टी असूनही वनस्पतीमध्ये जागृति आहे किंवा नाहीं, ह्याची शंका आहे. जागृति असल्याबद्लचा पुरावा अजून आढळला नाहीं. उत्तेजन किंवा प्रत्युत्तर ही सर्व एकांगी दिसतात. नको किंवा होय म्हणणारी जागृतीसत्ता कोठेही आढळांत येत नाहीं. जीवनकणांच्या नेहमीच्या क्रिया निरनिराळ्या असून त्यांत साधेपणा आढळतो. जीवनकणांस उपजत बुद्धी नसावी असे वाटते. जी गोष्ट नको असते, तिचा प्रतिकार जीवनकणांस प्रथमपासून करितां येत नाही. मागाहून जरूर नसणाऱ्या वस्तूंचे अन्य तऱ्हेनें विसर्जन करितां येते.

---------------
प्रकरण १७ वें.
---------------
जननेंद्रियें-फुलें.
---------------

 मागील प्रकरणी पोषक अन्न मिळविणारी अवयवे व तत्संबंधी विचार करण्यांत झाला. अवयवांची बाह्य-रचना व अंतर-रचना तसेच प्रत्येकाची विशिष्ट कामें, कामास जरूर लागणाऱ्या विशिष्ट गोष्टी, वगैरेचे वर्णन करण्यात आले. आतां जननेंद्रियें, जननेंद्रियाचे प्रकार, निरनिराळी फुले, फुलांतील प्रमुख वर्तुळे, पुष्पाधार, फुलांची मांडणी, स्त्रीकेसर व पुंकेसर फुलें, इत्यादिकांचे वर्णन जननेंद्रियाखाली येते. तसेच अण्डाशय (Ovary), गर्भ (Embryo) परागपिटिका (Anther), पराग (Pollen), त्यांचे संमेलन व गर्भधारणा ( Fertilisation ), शिवाय फलें, बीजे व बीजोत्पादन वगैरे गोष्टींचा उल्लेख फुलांमध्ये अथवा जननेंद्रियामध्ये होऊ शकतो.