पान:वनस्पतिविचार.pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १४३
-----

ज्ञानतंतूंची व्यवस्था वनस्पतिवर्गात कमी दर्जाची असते. तसेच ज्ञानतंतू अमूक एका ठिकाणी सांठविले आहेत असे नाही. वस्त्र्याने अथवा चाकूने कापून परिछेदांत ज्ञानतंतूची विशिष्ट जागा पाहण्यास मिळेल अशी स्थिति नसते. जीवनकणास ज्ञान असून ते वेळोवेळी व्यक्त होते. प्राणिवर्गाप्रमाणे जसे डोक्यांत अथवा इतर जागी त्यांचे लहान लहान ज्ञानपिंड आढळतात, त्याप्रमाणे वनस्पतिवर्गात आढळणे शक्य नाहीं, तसेच एकाच अवयवांवर पुष्कळ उत्तेजने एकाचवेळी जरी मिळाली, तथापि त्या सर्वांस निरनिराळे प्रत्युत्तर ते अवयव देते. मुळाचे अग्रास एकाचवेळी, जमिनीचा स्पर्श, गुरुत्वशक्ति तसेच जमिनीतील पाण्याचे वेगवेगळे प्रमाण, हीं तीन उत्तेजने मिळत असून ह्या तिन्ही उत्तेजनांस वेगवेगळ्या प्रतिक्रिया ते करीत असते. आतां मुळाच्या अग्रांत ह्या तिन्हीस उत्तर देणारी शक्ति कोठे सांठविली आहे, हे पाहिले असतां कांहींच कळणार नाहीं. अग्राजवळील वाढत्या बिंदूतील जीवनकणच ह्या सर्वांस प्रत्युत्तरे देतात. जीवनकणांत अशा प्रकारची उत्तेजनास प्रत्युत्तर देण्याची शक्ती असते. जीवनकणांस संकुचित अथवा दीर्घ होण्याची शक्ती असते, त्यामुळे शरीरातील पाण्याचा प्रवाह थांबविणे अथवा सारखा सुरू राखणे त्यांस करता येते. वनस्पतीचे मुख्य कर्तव्य म्हणजे शरीरातील पाण्याच्या प्रवाहाची सुयंत्रित व्यवस्था करणे होय. कारण त्यावरच जीवनकणांचे अस्तित्त्व अवलंबून असते.

 मज्जातंतू व त्याचे विशिष्ट पिंड Ganglia ह्यांकडून बाह्य उत्तेजनाचे ज्ञान प्राण्यास होत असते. सर्व मज्जातंतूचा एकमेकांशी परस्पर संबंध असल्यामुळे उत्तेजित ज्ञान सर्व शरीरास कळते, अथवा त्याचे केंद्रस्थान जे डोकें तेथे पोहोंचून त्याचे प्रत्युत्तर तेथूनच देण्यात येते. वनस्पति-शरीरांतील सजीव पेशींचा संबंध जीवकणांच्या सूक्ष्म-तंतूंनी जोडिला असतो. पेशीमित्तिका रंध्रमय असून त्यांतूनच जीवतंतू परस्पर जोडिले असतात. जसे, प्राण्यामध्ये एका ठिकाणचे ज्ञान दुसऱ्या ठिकाणी केवळ ज्ञानतंतूंकडून जागजागी पोहोंचविले जाते, तद्वतच वनस्पतीमध्ये जीवतंतूंकडून एका पेशींतून दुसऱ्या पेशींत ज्ञान अथवा उत्तेजन पाठविले जाते. ही व्यवस्था खरोखर उच्चवर्गीय मज्जातंतूच्या व्यवस्थेसारखी असते, ह्यांत संशय नाहीं.

 मज्जातंतूची कार्ये जशी प्राण्यामध्ये विशिष्ट प्रकारची असतात, तशी कार्ये वनस्पतिवर्गात आहेत काय, हे अजूनी कांहीं ठरलें नाहीं. तसेच पेशींतून जीव-