पान:वनस्पतिविचार.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



एंजिनांत पाणी, कोळसा ( अगर लांकडे ) भरून उष्णता पोचविली म्हणजे एंंजिन पूर्ववत सर्व क्रिया करू लागते; परंतु तीच उष्णता मनुष्याच्या मृत शरीरास दिल्यास काय होते ? अन्नपचन, रुधिराभिसरणादि क्रिया पूर्ववत् सुरू होण्याचे बाजूलाच रहाते; परंतु चितेवरील जबरदस्त उष्णतेमुळे सर्व शरीरच्याशरीर भस्मीभूत होते, म्हणजे त्याची राख रांगोळी होते. आणि त्याबरोबर व्यक्तिशः जिवंत असलेल्या त्या मृत शरीरातील असंख्य पेशी मात्र मृत्युमुखांत बळजबरीने कोंबल्या जातात ! याप्रमाणे प्राण म्हणजे केवळ उष्णता कांहीं नव्हे, असे खात्रीलायक सिद्ध होते.

 प्राण म्हणजे एकप्रकारचा वायु आहे, असे सिद्ध करणे देखील वरीलप्रमाणेच दुरापास्त होणार. मनुष्याच्या शरीरामध्ये एक वायु असतो, त्याला स्थल परत्वे प्राण, अपान, उदान, समान, व्यान, हीं नांवे आहेत, असे सांगण्यांत येते; परंतु हवेप्रमाणे त्या वायूचे पृथक्करण झालेले नाही व तो वायु म्हणजे कोणतें मूलतत्त्व अगर कोणत्या मूलतत्त्वांचे मिश्रण हे ठरलेलें नाहीं. यदाकदाचित् तसे ठरलेले असते, तरी मृत शरीरामध्ये तो वायु भरल्याने मनुष्य पुन्हां जिवंत झाला असता किंवा नाही, याबद्ल पुष्कळ वानवाच आहे. खाटीक बकऱ्याचे पोट फाडून आतील आंतडी, कोथळा, वगैरे बाहेर काढितो; परंतु पुन्हां ते सर्व भाग त्याला पूर्ववत् जागच्या जागी बसवितां येत नाहीत; कारण ते बाहेर काढतांना असा कांहीं एक पदार्थ फाटतो अगर नासतो की, जो आज तारखेस आम्हांस बनवितांच येत नाही. याचप्रमाणे प्राण गेला म्हणजे अशी एक कांहीं चीज बाहेर जाते कीं, जिचे पूर्ण स्वरूप आज मितीस आम्हांस कळलेले नाही. याच कारणामुळे सचेतन-अचेतन, सजीव-निर्जीव, सेंद्रिय-निरिंंद्रिय यांच्यांमधील खरा भेद कळत नाही, आणि तप्त अपोगोलकांत चैतन्य आहे की नाही, ह्वेने तट्ट फुगलेल्या भात्यांत जीव आहे की नाही, लोहचुंबक टाचणीला अगर सुईला आकर्षितो, ती क्रिया इच्छापूर्वक अगर सहेतुक होय की नव्हे, इत्यादि प्रश्न आम्हांस अगदीं गोंधळवून सोडतात. एंजिनमध्ये पाणी भरून त्याची वाफ करून, ती आळीपाळीने दट्ट्याच्या दोन्हीं बाजूस सोडिली, म्हणजे दट्ट्या मागे-पुढे सरून गाडी हालू लागते; तथापि पाण्यास बेतवार उष्णता देऊन वाफ योग्य मार्गाने आणि योग्य प्रमाणानें पोचविण्यास ड्रायव्हर हजर असावा लागतो. ते काम फायरमन ( आगवाला )