पान:वनस्पतिविचार.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १३९
-----

पुष्कळ वेळ चालू राहतात. मंद प्रकाशांत नागमोडीप्रमाणे गती खोडाच्या वाढत्या अग्रास मिळत असते. एकपेशी वनस्पतीमध्ये सुद्धा उत्तेजनास प्रत्युत्तर मिळते.

 जसे प्रकाशाकडून वनस्पतीस उत्तेजन मिळत असते, तसेच गुरुत्वाकर्षणशक्तीपासूनही उत्तेजन वनस्पतीस मिळते. गुरुत्वाकर्षणशक्तीने मुळया जमिनीत पृथ्वीमध्यबिंदूकडे ओढिल्या जातात. जर मुळ्यावर गुरुत्वाकर्षणशक्तीचा परिणाम होतो, तर खोडावरही त्याचा परिणाम कां होऊ नये, असा प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे. खोडावरसुद्धा गुरुत्वशक्तीचा परिणाम होतो, पण मुळांवर ज्या प्रकारचा तो होतो त्याच्या उलट खोडावर होतो, म्हणजे मुळ्यावर पृथ्वी मध्यबिंदूकडे आकर्षिली जातात, तर खोड त्यांचे उलट पृथ्वीमध्यबिंदूपासुन दूर नेले जाते, त्यायोगाने खोड सरळ जमिनीबाहेर वाढते. तसेच खोडावर फांद्या, पाने वगैरेचे जे एवढे मोठे ओझे असते, त्याचे वजन सहन करण्याची शक्ति गुरुत्वशक्तीमुळे त्यास प्राप्त होते. नाहीतर एवढ्या मोठ्या ओझ्याखाली पुष्कळसे वृक्ष वाकून जमिनीवर ओणवे पडले असते. पण उलट प्रकारच्या गुरुत्वाकर्षणशक्तीच्या प्रभावामुळे झाडे सरळ उभी राहू शकतात. तृणजातीमधील वनस्पति वाऱ्यानें अगर पावसाने जमिनीवर खाली ओणवीं पडून पुनः कांही दिवसांनी सरळ होतात. ह्याचे मुख्य कारण गुरुत्वशक्ति होय. जमिनीपासून झाड सरळ वाढण्यास गुरुत्वशक्तीच कारणीभूत असते.

 प्रकाश अगर गुरुत्वाकर्षणशक्ति ह्यामुळे मिळणारे उत्तेजन सर्व वनस्पतींत सारखे असते असे नाही. तसेच एकाच वनस्पतींत सर्व स्थितींत ते उत्तेजन एकच असणे शक्य नसते, त्यांत वारंवार फरक होत असतात.

 दुसऱ्या पदार्थांचा वनस्पतीस स्पर्श झाला असतां वनस्पतीस उत्तेजन मिळतें. याची उदाहरणे लाजाळू वगैरे. वनस्पती जमिनीत उगवतांना मुळांचा संबंध कठीण दगडाशी आला असतां मुळास एक प्रकारचे उत्तेजन मिळून मुळे आपली वाढण्याची दिशा बदलतात. कठीण जागा सोडून जिकडे मऊ जागा असेल, तिकडे मुळे वळतात. मुळाच्या अग्रास उत्तेजन मिळते खरे व त्यायोगाने पाठीमागील बाजू कमान करून वळते. कधी कधी कोवळ्या स्थितीत जर वाढत्या बिंदूस धक्का बसला असेल, तर मुळे उलट माघार न घेता त्या कठीण जागेवर वाढण्याचा प्रयत्न करतात, पण तेथील वाढ बंद झाल्यामुळे दुसऱ्या बाजूच्या पेशी वाढून नवीन मुळ्या सुटतात. वेलाचे वर चढत जाणे हेही