पान:वनस्पतिविचार.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


६

पदवी देण्यात आली आहे. त्या अर्थी वनस्पति म्हणजे सिंह होय असे म्हटल्यास ‘ वनस्पति ' आणि ' प्राणि ' म्हणजे ' झाडे ' आणि 'जनावरे ' असे वर्ग करण्यास सवडच उरत नाही. उडु म्हणजे तारा आणि मृग म्हणजे जनावर. सर्व ताऱ्यांमध्ये मोठा म्हणून चंद्रास उडुराज म्हणतात, आणि सर्व प्राण्यांमध्ये प्रबल म्हणून सिंहास मृगराज म्हणतात. अशा अर्थाने पहातां नर्मदातटाकी असलेल्या कबीरवडाप्रमाणे सर्व झाडाझुडपांमध्ये अत्यंत विस्तीर्ण अशा झाडास तरुराज अगर वृक्षराज असे म्हणणे अगदी सयुक्तिक होईल. आणि पुढे क्रमेंकरून वटवृक्षाचे अगर इतर कोणत्याही याहून मोठ्या झाडाचे हे विशेषनामदेखील बनविता येईल. तरुराज अगर वृक्षराज म्हणण्याऐवजी वनराज ऊर्फ वनस्पति म्हणण्यामध्ये दोन अडचणी येतात. वन हा शब्द समुदायवाचक असल्याने तो प्रत्येक झाडास लावता येत नाहीं. उडूंचा राजा म्हणून उडुराज, मृगांचा राजा म्हणून मृगराज, त्याप्रमाणेच वनांचा ( झाडांचा नव्हे ) राजा म्हणून वनराज ऊर्फ वनस्पति असे प्रतिपादन करता येत नाही. शिवाय उडुराज, मृगराज या शब्दाप्रमाणे वनराज अगर वनस्पति हें विशेषनाम करून कोण्या एका विविक्षित झाडास दिल्यास हल्ली चालू असलेल्या वहिवाटीप्रमाणें प्रत्येक झाडास ते लावता यावयाचें नाहीं. सारांश, सांकेतिक अगर पारिभाषिक या नात्याने वनस्पति हा शब्द तरु, वृक्ष, लता, झाड इत्यादिकांशी समानार्थक समजावयाचा आहे. त्याच्या व्युत्पत्तिबद्दल काथ्याकूट करण्यांत कांहीं हांशील नाहीं.

 ‘प्राणी ' या शब्दाची देखील अवस्था अशीच आहे. ज्यास प्राण आहे तो प्राणी, प्राणाचे स्वरूप ओळखणे बरेच कठीण व दीर्घ प्रयासाचे असून, परिणामी प्रस्तुत इष्ट कार्यास साधकच होईल; अशाबद्दल बिलकुल खात्री नाहीं. प्राण ही एक प्रकारची शक्ति आहे, असे सांगितल्याने कांहीं विशेष बोध होत नाहीं. कारण उष्णता, प्रकाश, विद्युत, चुंबकाकर्षण वगैरे शक्तीचे प्रकार सहज सुचविता येतात. मनुष्य मेला म्हणजे प्रथम त्याचे शरीर गार पडते. बाकी सर्व निदान कांहीं वेळपर्यंत तरी अगदी यथापूर्व असते. अशा प्रसंगी प्राण म्हणजे उष्णता असे सकृद्दर्शनी ठरल्यासारखे दिसते खरे. कारण प्राणोक्रमणामुळेच म्हणजे त्या उष्णतेच्या अभावींच, रुधिराभिसरण, श्वासोच्छ्वास, ज्ञानतंतुस्फुरण इत्यादि दरोबस्त क्रिया बंद पडतात. उलटपक्षी आगगाडीच्या