पान:वनस्पतिविचार.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१३०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

हरिद्वर्णक (Chlorophyll ) वनस्पतीपोषणास अप्रत्यक्ष मदत करितो. हें प्रसिद्ध आहेच. तो सजीव हरिद्वर्ण शरीरांत असून त्याची उत्पत्तीसुद्धा सजीव कणाच्या विघटीकरणामुळे होते. तथापि ह्याच्या उत्पत्तीस चार बाह्य गोष्टींची अवश्यकता असते. १ प्रकाश, २ विशिष्ट उष्णता, ३ शुद्ध हवा, व ४ लोहाचा अंश ह्या बाह्य गोष्टीपैकी एखादी गोष्ट कमी असली तर हरिद्वर्ण शरीरांत फरक होतो. हिरवी पाने प्रकाश कमी असेल तर पिवळी फिकट होतात; पण प्रकाश पुनः मिळू लागला असतां पूर्वीप्रमाणे ती हिरवी होतात.

 उष्णता कमी झाली असता त्याचा परिणाम त्यावर लगेच होतो. वसंत ऋतूचे सुरुवातीस झाडांची पानें तांबूस असतात, पण अधिक उष्णता मिळू लागली म्हणजे ती आपोआप हिरवीं होतात.

 शुद्ध ऑक्सिजन वायू वनस्पतीस न मिळाला तर पाने रोगट अगर फिकट होतात, पण उलट तो वायु चांगला मिळाला असतां पूर्वीची स्थिती येते.

 जमिनीत लोहाचा अंश नसेल तर हरिद्वर्ण ( Chlorfyll) कणच उत्पन्न होणार नाहींत.

 फुलामध्ये सुद्धा निरनिराळे रंग आढळतात. केवळ पुंकेसर (Staminate) अगर केवल स्त्रीकेसर (Pistillate) फुलांत अशाच चमत्कारिक रंगांचा उपयोग होतो. रंगास भुलून निरनिराळे कीटक त्यावर बसतात व त्याचा परिणाम पराग ने आण करण्यांत होऊन गर्भधारणेस मदत होते.

 फुलांमध्ये मधुररस आढळतो. ह्याचा उपयोगही पुष्कळ वेळां गर्भसंस्थापनक्रियेस होतो. रंगाचा अथवा मधुररसाचा वनस्पतिकार्यास अप्रत्यक्ष उपयोग असतो.

 मेण, निरनिराळी तेलें, रेझिन, टॅनिन् वगैरे पदार्थ सजीव कणांच्या प्रत्यक्ष निघटीकरणामुळे जरी नाहीं, तथापि त्यांपासून तयार झालेल्या पदार्थांतून हे पदार्थ शेवटीं उत्पन्न होतात. आता ह्या पदार्थांपैकी काही ठिकाणी तेल हें प्रत्यक्ष त्यांच्या विघटीकरणापासून उत्पन्न होते. म्हणजे जसे कांहीं विशिष्ट-पिंडापासून विशिष्टरस उत्पन्न होतो, तद्वतच जीवनकणांपासून तेल उत्पन्न होते. अलीकडील शोधांती रेझिन ही वस्तु पेशीभित्तिकेच्या विघटीकरणामुळे उत्पन्न होते, असे सिद्ध झाले आहे.