पान:वनस्पतिविचार.pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वनस्पतिविचार.pdf

  'वनस्पतिविचार ' म्हणजे झाडाबद्दलची माहिती. 'झाड' म्हटल्याबरोबर वड, पिंपळ, बाभूळ, कोऱ्हांटी, तगर, कण्हेर, पुदीना, मका, मोहरी इत्यादि अनेक लहान मोठे वृक्ष नजरेपुढे येतात आणि साधारण मनुष्यास देखील हो सिद्ध शब्द (झाड) अत्यंत परिचयाचा वाटतो, व तो पुष्कळ अंशाने मार्गदर्शक असतो, हेही पण खरे आहे. " पुष्कळ अंशाने " म्हणण्याचे कारण साधारण मनुष्यास ‘ झाड ' या शब्दानें बुरसा, धोंड ( दगड ) फूल, शेवाळे, भूछत्र, अळंबे इत्यादि अनेकविध सूक्ष्म वनस्पतींचा बोध होत नाहीं. लहानमोठ्या वृक्षलतादिकांचा समावेश करण्याच्या उद्देशाने ' झाडेझुडें ' झाडे झुडपे ' 'झाडझाडोरा ' इत्यादि शब्दांची योजना होते; परंतु तेथे देखील वरील सूक्ष्म वनस्पति लक्षांत न येऊन अगर निरुपयोगी समजल्या गेल्यामुळे, प्रायः वगळलेल्याच असतात. 'वनस्पति' म्हणजे काय ? वन म्हणजे अरण्य अगर जंगल; अर्थात झाडाझुडपांचा प्रचंड समुदाय. साधारण छोट्या समुदायास वन म्हणत नाहींत; बाग, शेत, कुरण वगैरे कांहीतरी म्हणतात. या वनाचा पति ( षष्ठीतत्पुरुष समास मानल्यास वनस्पति ! ) म्हणजे मालक अगर नियंता कोण ? खरा मालक ईश्वर असला, तरी ' वनस्पति ' हा शब्द ईश्वरवाचक नाहीं हें खास. तो जगच्चालक प्रभु वनाचाच काय, परंतु अखिल सृष्टीचा खरोखरीचा सर्वतोपरी मालक आहे, ही निर्विवाद गोष्ट आहे. तर मग ' वनस्पति ' म्हणजे जंगल अधिकारी (Conservator of Forest ) तर नव्हेना ? छेः, असा अर्थ करणे म्हणजे केवळ शब्दच्छलच होईल. अरण्याचा टाप आखून घेऊन त्यांत इतर कोणालाही फिरकू न देणाऱ्या मृगराजास ही यथार्थ