पान:वनस्पतिविचार.pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


३

आवृत्ति काढण्याचा सुदिन उगवल्यास, ही चित्रांची उणीव भरून काढण्याची उमेद ग्रंथकर्ता बाळगीत आहे.

 आतां पारिभाषिक शब्द शास्त्रीय ग्रंथांत ग्रंथकर्त्याने स्वतः तयार करून घालावे किंवा नाहीं, याविषयी बरेच मतवैचित्र्य आहे. स्वभाषेची वाढ होण्यास पारिभाषिक शब्द आपल्याच भाषेत असावेत, असे मला वाटत असल्यामुळे, मी ते यथामति तयार करून घातले आहेत. ते शब्द यथार्थच आहेत, असा माझा आग्रह नाही, आणि म्हणूनच त्यांची योग्यायोग्यता हा विषय इंग्रजीतून शिकलेल्या विद्वान् लोकांस ठरविता यावा व त्याप्रमाणे अशा चर्चेस चालन मिळावे, या दुहेरी हेतूने तयार केलेल्या प्रत्येक पारिभाषिक शब्दापुढे तत्सदृश इंग्रजी शब्द दिला आहे; व कांही ठिकाणी एकच अर्थ दर्शविणारे दोन प्रकारचे शब्द कोठे कोठे पडले आहेत, असा संशय आल्यामुळे पुस्तकाच्या शेवटीं ‘शब्द सूची ' ही दिली आहे, तिचा उपयोग वाचकांनी करावा अशी त्यांस नम्र विनंति आहे.

 सरतेशेवटी ज्यांचे सहाय्य मिळाले नसतां माझ्या ह्या कृतीस आजचे स्वरूप निदान इतक्या लवकर प्राप्त होणे कधीही शक्य नव्हते व ज्यानी स्वभाषेची सेवा आज कित्येक वर्षे तनमनधन अर्पण करून चालविली आहे, असे जे ग्रंथप्रसारक मंडळीचे चिटणीस रा० रा० दामोदर सांवळाराम यंदे यांचे व तसेंच माझी हस्त लिखित प्रत तपासून मला कांहीं अत्यंत उपयुक्त सूचना केल्याबद्ल, गुरुवर्य प्रो० भाटे ( यांनी माझ्या ग्रंथास प्रस्तावना लिहून माझा विशेषच गौरव केला आहे), प्रो० दीक्षीत, रा ० रा. लक्ष्मण बाळाजी मोडक, परममित्र रा० बाळाजीपंत पटवर्धन, रा० भास्करराव घारे, रा० माधवराव फाटक व डॉ० नंदकिशोर यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे, आणि ते मी मोठ्या आनंदानें करितो.

ग्रंथकर्ता.

शेतकी कॉलेज

कानपूर, १२-७-१३.

-------------------------