पान:वनस्पतिविचार.pdf/129

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१२ वे ].    बाष्पीभवन (Transpiration.)    १०१
-----अथवा सालीचे पदर ह्यांतून रसप्रवाह वर चढत नसून केवळ काष्ठवाहिन्यांतून तो वर चढत जातो.

 ह्याप्रमाणे काष्ठवाहिन्यांतून वर चढणारा रस शिरांतून वरच्या पृष्ठभागांत येतो. ह्या रसांत विरघळलेले निरिंद्रिय पदार्थ असतात, हे विसरता कामां नये. निरिंद्रिय पदार्थांवर पानामध्ये रासायनिक काम घडून त्यास ऐंद्रिय पौष्टिक पदार्थ बनविणे हा मुख्य उद्देश इतक्या खटाटोपीचा असतो. कारण त्यापासून त्यांची वाढ व पोषणक्रिया घडतात. म्हणून वनस्पतीच्या आयुष्यक्रमांत ऐंद्रिय पदार्थ बनविणे हे एक मोठे महत्त्वाचे कार्य असते. ज्याप्रमाणे मुळांतून निरिंद्रिय पदार्थ-मिश्रित पाणी शोषीलें जाते, तद्वतच पानांतून हरित-वर्ण शरीराच्या साहाय्याने कार्बन् आम्लवायूचे शोषण केले जाते. कार्बन् आम्ल वनस्पतीच्या वाढीस फार जरूरीचे असते. कार्बन आम्लाचे विघटीकरण होऊन मुळांतून वर चढणाऱ्या निरिंद्रिय पदार्थांशी संयोग होऊन ऐंद्रिय पदार्थ बनतात, कार्बन् आम्ल शोषण व विघटीकरण ह्यांस सूर्यप्रकाशाची जरूरी असते. सूर्यप्रकाश जर नसेल तर ती दोन्हीं कार्ये होणार नाहींत.

 पानाची रचना पूर्वी वर्णन केलेली आहेच. वरील पृष्ठभाग जास्त हिरवा असून खालील भाग अधिक फिका व खरखरीत असतो. शिवाय खालील पृष्ठ भागावर बाह्यत्वचेत शेकडों त्वचारंध्रे (Stomata ) असतात. खालील बाजूकडे स्पंजासारखी जाळीदार अव्यवस्थित पेशीरचना असून पुष्कळ पेशीमध्ये पोकळ्या आढळतात. कच्चा रस पानांत आल्यावर त्याचे विघटीकरण वरील पृष्ठभागामध्ये होत असते. पानांत शिरा चोहोकडे खिळल्या गेल्या असल्यामुळे त्यांतून येणारा रस वरील पृष्ठभागांत ओतिला जातो, तेथेच कार्बन् आम्ल विघटीकरण झाल्यावर त्या पाण्याशी रासायनिक संबंध होऊन त्यांचे सत्व व पाणी तयार होते. सत्त्व वनस्पतीस उपयोगी असल्यामुळे त्याची खाली नेण्याची व्यवस्था लागलीच होते. रासायनिक संबंध होऊन जे पाणी तयार होते, ते निरुपयोगी असल्यामुळे त्याचा उच्छ्वास होणे जरूर असते. हे पाणी खालील भागांतील स्पंजासारख्या अव्यवस्थित पेशींत येऊन त्याचे बाष्पीभवन सुरु होते. खालील बाजूस पेशीमध्ये पोकळ्या असतातच. त्या पाकळ्यांत ही वाफ प्रथम जाऊन हळू हळू त्वचारंध्रांतून बाहेर हवेत मिसळली जाते.