पान:वनस्पतिविचार.pdf/12

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


रा० काशीनाथ बाळकृष्ण मराठे, गुरुवर्य प्रो० भाटे, वगैरेसारख्या विद्वान् गृहस्थांनी लिहिलेली आहेत. सर भालचंद्र व रा० ब० मराठे यांच्या पुस्तकांत वनस्पति शास्त्रांतील मुख्य भागांची अत्यंत त्रोटक अशी माहिती दिली आहे. प्रो० भाटे यांच्या ' जननमरणमीमांसा व जीवनशास्त्र' या पुस्तकांतून वनस्पति व प्राणिकोटी यांमधील साम्यभेदांचा तुलनात्मक रीतीने ऊहापोह केलेला आहे. या पुस्तकांतील विषय सुलभ व चटकदार भाषेत कोणत्याही सुशिक्षित माणसास सहज समजेल अशा रीतीने मांडला आहे. परंतु या तिन्ही पुस्तकांत वर निर्दिष्ट केलेल्या भागांची विस्तृत अशी थोडीबहुत माहिती ज्यांत सांपडेल, असा एखादा ग्रंथ आपल्या भाषेत असावा अशी सहज प्रेरणा मनांत एक दिवस उत्पन्न झाली, आणि ईशकृपेनें व कांहीं मित्रांच्या प्रोत्साहनाने ती मनांत कायम राहिल्यामुळे, या प्रेरणेचे रूपांतर प्रयत्नांत झाले व त्या प्रयत्नांचे दृश्य फल हा वेड्यावाकड्या भाषेत लिहिलेला ग्रंथ होय. ग्रंथकर्त्यास अवश्य असणारे भाषाप्रभुत्व माझे ठिकाणी नाही, तसेच आपल्या अल्पमतीच्या जोरावर लिहिलेले पुस्तक स्वतः प्रसिद्ध करण्याचे द्रव्यबल तरी जवळ होते, असेही नाही. तेव्हां अशा प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या ग्रंथांत बरेच दोष वाचकांस सांपडणे संभवनीय आहे. परंतु मातृभाषेची एक अत्यल्प सेवा, एवढ्याच एका गोष्टीच्या भरंवशावर वाचकवर्ग या माझ्या कृतीकडे हंसक्षीरन्यायाने पाहून योग्य त्या सूचना करतील, अशी मी आशा करितों.

 कोणत्याही शास्त्रीय ग्रंथांतील विषय सहज समजण्यास त्यांतील पारिभाषिक शब्द सुलभ असले पाहिजेत. तसेच वनस्पतीशास्त्रासारखा विषय प्रत्यक्ष निरनिराळ्या वनस्पतींचे नमुने पाहून जितका समजेल तितका तो निवळ वाचनाने समजणे अशक्यच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु दूध नाही तर निदान दुधाची तहान ज्याप्रमाणे ताकाने अंशतः शमन होते, त्याच न्यायाने प्रत्यक्ष ताजी जिवंत वनस्पति पाहण्यास मिळाली नाही, तरी ते कार्य पुस्तकांत त्यांच्या आकृती दिल्या असतां बरेंच भागते. परंतु आमच्या पुस्तकांत आकृती किंवा चित्रे घातली नाहीत. यामुळे ग्रंथपूर्तीस बराच कमीपणा आला आहे. ग्रंथांत चित्र देणे बरेच खर्चाचे काम आहे व ग्रंथकर्ता पडला गरीब; तेव्हां हा दोष याच्यावर लादणे निष्ठुरतेचे होईल. तरीपण ईशकृपेने या पुस्तकाची दुसरी