पान:वनस्पतिविचार.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

आढळते. पाने देंठयुक्त अथवा देठरहित असतात. देठाची अंतररचना साधारणपणे कोवळ्या खोडाप्रमाणे असते. देठ पूर्ण वाटोळा नसल्यामुळे त्यांची रचना अर्थचंद्राकृति दिसते. त्याचे दोन्ही पृष्ठभाग निराळ्या रचनेचे दिसतात. काष्ठ पदर वरील पृष्ठभागाकडे वळलेले असतात. खोडामध्ये काष्ठ मध्यभागाकडे असते. हा फरक देंठ व खोड ह्यांत चांगला दिसतो. ग्रंथींची संख्या दोन अथवा तीन असून, ग्रंथीमध्ये संवर्धक पदर फार वेळ नवीन पेशी उत्पन्न करण्याचे काम करीत नाही. अंतराल संवर्धक पदर ( Inter fascicular Cambium ) तसेच साधारण अंतरत्वचा ( Endodermis ) ह्यांचा अभाव असतो. बाह्य त्वचेत कधी कधी त्वचारंध्रे असून त्यांचा संबंध आंतील वायुयुक्त पोकळ्यां ( Air chamber ) शी असतो. पानांप्रमाणे देठामध्येही हरितवर्ण पदार्थ (Chlorophyll) असतो.

 पानाचा आडवा छेद घेणे फार कठीण असते. कारण वस्त्र्याच्या पात्याखाली कापण्याचे वेळी तो भाग लवत जातो, म्हणून बटाटा उभा चिरून त्या चिरेंत पानाचा तुकडा ठेवून द्यावा. वस्त्र्याने बटाट्याच्या भागासकट चिरेत असलेले पान कापावे म्हणजे पानाचा पातळ भाग कापला जाईल अथवा धाटाचे भेंड उभे चिरून त्या चिरेंत पानाचा तुकडा ठेवून द्यावा, म्हणजे वरील पानाचा पातळ भाग कापला जाईल. भेंड पात्याखालीं न लावतां कापण्यासही मऊ असते. अशा रीतीने कापून तयार केलेला पातळ भाग सुक्ष्मदर्शक यंत्रांत पाहण्यास सुरुवात करावी. मात्र त्यांत मध्यशिरेचा आडवा भागही यावा. कापण्यास आपण प्रथम सूर्यकमळाचे पान पसंत करू.

 १. मध्यशिरेत एक वाहिनीमय ग्रंथी मोठी असून शिरेचा साधारण आकार अर्धचंद्राकृति असतो. खोलगट भाग हा वरील पृष्ठभाग असून बाहेर फुगलेला भाग अधःपृष्ठभाग असतो. दोन्ही पृष्ठभागांवर बाह्य त्वचेचा एक पेशीमय पदर असून त्यापासून जागजागी केस आलेले दृष्टीस पडतात. ग्रंथीमधील काष्ठावरील पृष्ठभागाकडे व तंतुकाष्ठ अधःपृष्ठभागाकडे आढळते. बाह्यत्वचेनंतर आढळणाऱ्या समपरिमाण पेशीमालिकेंत हरितवर्ण शरीरे असतात, व त्यामुळे त्यांस हिरवा रंग आलेला असतो.

 १. मध्ये शीर पाहिल्यानंतर बाजूकडील भाग पहावेत. मध्यशिरेच्या बाह्य त्वचेचे पदर दोन्ही बाजूस तसेच वाढलेले आढळतात. त्वचारंध्रे अधःपृष्ठ-