पान:वनस्पतिविचार.pdf/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

जास्त ग्रंथींचा भरणा असतो. प्रत्येक ग्रंथीसभोंवतीं जाड कातडीच्या पेशीचे म्यान असते. जाड कातडीच्या पेशीचा रंग पिवळट किंवा तांबुस असतो. ग्रंथींमध्ये काष्ठ ( Xylem ) व तंतुकाष्ठ (Phloem) असून संवर्धक पदराचा अभाव असतो. काष्ठवाहिन्या चार असून पैकी फिरकीदार एक व वळेदार एक अशा दोन वाहिन्या प्रथमकाष्ठांत (Protoxylem) असून दुसऱ्या दोन खाचेदार बाह्यांगाकडे असतात. वाहिन्या सोडून काष्ठाची मध्य जागा बहुतेक काष्ठतंतून भरलेली असते. काष्ठाचा आकार इंग्रजी V अक्षरासारखा असून निमूळते टोंक मध्यभागाकडे असते. वरील रुंद व्हीच्या पोकळीत तंतुकाष्ठ चाळणीदार वाहिन्या व प्रथमतंतुकाष्ठ (Protophloem ) असतात. जसा आडवा भाग कापून वरील सर्व पदर दिसतात, तद्वतच उभा सरळ भाग कापिला असतां ते सर्व दीर्घ स्थितीत अढळतात. बाकी इतर फरक नसतो. ग्रंथामध्ये संवर्धक प्रदर अथवा अंतरालसंवर्धक पदर आढळत नसून त्यामुळे खोडाची रुंदी वाढत नाहीं; परंतु नारळ, ताड वगैरे झाडे एकदलधान्यवर्गापैकी असून त्यांचा बुंधा बराच मोठा व रुंद असतो. अथवा मक्याचे खोडसुद्धा कोवळ्या स्थितीपेक्षा जुन्या स्थितीत आपल्या मानाने रुंद व मोठे होत असते. जर असल्या खोडांची द्वितीय वाढ (Secondary Growth ) संवर्धक पदराच्या अभावामुळे होत नसते, तर ही रुंदी व जाडी कोठून आली असा साहजिक प्रश्न उत्पन्न होतो. स्ट्रॉसबरगर साहेबाचे असे म्हणणे आहे की, पूर्वी असलेल्या सालीतील पेशी अधिक ताणल्या जाऊन मोठ्या फुगतात, त्यामुळे खोडासही द्वितीय वाढ आली आहे असे वाटते. शिवाय अशाकडील वाढ प्राथमिक स्थितीत अति जोराची असून पुष्कळ पेशी उत्पन्न होतात. ह्या पेशींमुळे नवीन कांडी व अंतरकांड जास्त रुंदीची होतात. तसेच खोडास उलट्या शंकूसारखा आकार येतो. पण पुढे लवकरच सारखी वाढ होऊन उभा सरळ सोट बनतो.

 घायपात, दर्शना वगैरेमध्ये खोडाची रुंदी दरवर्षी थोडी अधिक वाढते. ही रुंदी ग्रंथीच्या संवर्धक पदरामुळे नसून स्तंभाच्या बाह्यांगांत म्हणजे परिवर्तुळामध्ये कांहीं पदर संवर्धक होऊन नवीन ग्रंथी उत्पन्न होतात, व त्यामुले खोड थोडे अधिक वाढत जाते. दर्शनाच्या ग्रंथींमध्ये मध्यभागी तंतूकाष्ठ असून सभोंवती काष्ठाचे वेष्टण असते.