पान:वनस्पतिविचार.pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

परिवर्तुळाच्या पेशी मात्र अधिक जाड होऊन त्यापासून चिवट तंतू बनतात. अशावेळी तंतूंचे पुंजके निळसर रंगाचे असून स्पष्ट दिसतात. ग्रंथीतील वाहिन्या मोठ्या होतात. भेंडींतील पेशी पहिल्याप्रमाणे रसाळ असत नाहींत. त्यांत जीवन कण फारसे आढळत नाहींत. हवा शिरून भेंड पूर्वीपेक्षां हलकें व पांढरे होते.

 खोडाचा उभा छेद सूक्ष्मदर्शक यंत्रांत पूर्वीप्रमाणे पाहिला असतां ही सर्व जालें लंब व दीर्घ स्थितीत असलेली आढळतील. परिवर्तुळाच्या जाड व परस्पर गुंतलेल्या तंतुमय शाखा स्पष्ट पाहण्यांत येतात. काष्ठांतील वाहिन्या (Vessels ) व तंतुपदर तसेच तंतुकाष्ठांतील चाळणीदार पट्टे वगैरे पाहावयास सांपडतात. आडवे व उभे भाग जेव्हां पांच सहावेळां सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहिले जातील, त्यावेळेस खोडाची खरी खरी अंतररचना माहीत होते.

 कवचाची उत्पत्ति तिची कमी अधिक जाडी अथवा तिचे निरनिराळे घटक पदर वगैरे पूर्वी वर्णिले आहेत. एखादें जुने लाकूड करवतीने आडवें कपिलें असतां आंत लाकडावर निरनिराळी वर्तुळे असलेली दृष्टीस पडतात. ही वर्तुळे कशी उत्पन्न झाली, हा साहजिक प्रश्न उद्भवतो. लाकूड जितके जुने व अधिक रुंद असते, त्या मानाने अधिक वर्तुळे असतात. नूतन व कच्च्या लाकडांत हीं वर्तुळे कमी असतात. वर्तुळांचा संबंध लाकडाचा जुनेपणा अथवा नवीनपणा ह्यावर पुष्कळ अवलंबून असतो. वर्षभर झाडांच्या अंतरक्रिया सारख्या चालतात असें नाहीं. कांही ऋतंत संवर्धन काम जोराने चालते व कांहीं ऋतूंत ते काम मंद व शिथिल असते. हिवाळ्यांत विशेषेकरून संवर्धन काम फार मंद चालते, संवर्धक पदराची शक्ति उन्हाळ्यात जोराची असून पुष्कळ काष्ठपदर उत्पन्न होतात. पण हिवाळ्यांत ती शक्ति मंद होऊन काष्ठपदर नवीन तयार होत नाहीत. शिथिलता संपून, जेव्हां वसंतऋतु सुरू होतो, तेव्हां पूर्वीसारखी वाढ होते. त्या वेळेस पूर्वीची शिथिलता व नवीन वाढ दर्शविणारी वर्तुलें पडतात. ह्यावरून वर्तुले म्हणजे शिथिलतेनंतर संवर्धनशक्ति जोरात सुरू झालेली द्योतक चिन्हे आहेत. तसेच साधारणपणे वर्षातून एकदा ती शक्ति शिथिल पडते, म्हणून त्या वर्तुलावरून झाडास अमुक वर्षे झाली असे ठरविता येईल. ज्याप्रमाणे जनावरांची वयें त्यांच्या दातांवरून सांगता येतात, त्याचप्रमाणे झाढांची वये लाकडांतील वर्तुलावरून अनुमानाने ठरविता येतात.