पान:वनस्पतिविचार.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

असल्या संवर्धक पदराचे बाह्यांगाकडील मृत पदरास ( Bark) असे म्हणतात. येथील कवचाची घटकजालें खोडावरील कवचाच्या घटकजालासारखीच असतात. जागजागी कवचावर भेगा अगर चिरा पडतात. कांहीं वनस्पतींत हे कवच वर्षास झडून नवीन कवच त्या जागी तयार होते.

 खोड—सूर्यकमळाचे बी पेरून त्याचे खोड सुक्ष्मदर्शक यंत्रांत पाहण्याकरिता तयार करावे. वस्त्र्याने शक्य असेल तितका पातळ आडवा छेद कापून कांच पट्टीवर तो भाग ठेवण्याचे पूर्वी पाण्याचा अगर ग्लिसरीनचा थेंब सोडावा व त्यावर तो भाग ठेवून कांच झांकणी (Cover slip ) हवा आंत न राहील अशा बेताने हळु सोडावी व यंत्रांतून पाहण्यास सुरवात करावी.*

 यंत्रामध्ये आपणास काय काय दिसते ते पाहूं:--

 १ प्रथम उपरीत्त्वचा अगर बाह्यत्वचा ( Epidermis) असून त्यावर तांतेसारखा पातळ पडदा कधी कधी आढळतो. हा पडदा संरक्षक असतो. बाह्यत्वचेपासून जागजागी केंस उगम पावलेले दृष्टीस पडतात. ते केंस केवळ एकपेशीमय नसून बहुपेशीमय सुद्धा असतात.

 २ दुसरा भाग म्हणजे साल ( Cortex) होय. बाह्यत्वचेला लागून वाटोळ्या पेशीचे चार अगर पांच पदर आढळतात. ह्यांत हरितवर्ण शरीरें ( Chlorophyll bodies ) असून जागजागी पेशीमध्यें पोकळ्या (Intercellular spaces ) असतात. शेवटी अंतरत्वचा ( Endodermis ) पदर असतो. कोवळ्या खोडांत अंतरत्वचा चांगली ओळखता येते. कारण त्यावेळी त्यामध्ये सत्त्वाचे कण असतात. जुन्या खोडांत ही त्वचा ओळखितां येत नाहीं.

 ३ नंतर स्तंभ (Stele ) सुरू होतो. स्तंभांतील मुख्य भाग म्हणजे वाहिनीमय ग्रंथी (Vascular bundle ) व त्यांचे सभोंवतीं असणारे

-----

 * ( हवेचे बुडबुडे आंत राहिले असतां मुख्य भागाकडील लक्ष्य कमी होऊन मन गोंधळण्याचा संभव असतो. अगोदर सूर्यकमळाच्या खोडाचे तुकडे करून ते स्पिरिट अगर अलकोहलमध्ये ठेवून देतात. त्यायोगाने ते तुकडे कठीण होऊन कापताना वस्त्र्याखाली लवत नाहींत व त्याचे पातळ भाग चांगले घेता येतात.)