पान:वनस्पतिविचार.pdf/105

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९ वे ].     अंतररचना.( Tissue).     ७७
-----

पाहिलेच आहे. वाढत्या पेशींत द्विधा होण्याची शक्ति मोठी जबर असून, त्यापासून मुळांतील इतर पेशीजालांचा उगम असतो.

 कांहीं मुळांत वाढती पेशी ( Growing cell ) लहान असून, कांटकोनाकृतीत ती द्विधा होत जाते. उच्च वर्गामध्ये वनस्पतींच्या वाढत्या कोंबांत असली वाढ नेहमी असते. क्षुद्रवर्गात वाढती पेशी मनोऱ्याप्रमाणे असून, ती समांतररेषेत बुडाकडून आडवी द्विधा होत जाते, व नेहमी मनोरी आकार वाढत्या पेशींत कायम असतो.

 एकदल अथवा द्विदल वनस्पतीमध्ये मुळांच्या अंतररचनेत मुख्य तत्त्वांत फारसा फरक नसतो. तंतुकाष्ठ व काष्ठग्रंथीची संख्या, एकदल वनस्पती अधिक असते. द्विदल अगर बहुदल वनस्पतीमध्ये मुळांत ग्रंथींची संख्या दोन पासून सहापर्यंत असते, पण एकदलांत ती संख्या आठपासून वीसपर्यंत सुद्धा आढळते. शिवाय येथील ग्रंथींची वाढ दुय्यम नसल्यामुळे प्राथमिक वाढ चांगली होते. तसेच पूर्ण ग्रंथामध्ये संयुक्त पदर न राहिल्यामुळे ग्रंथीची वाढ कायम व पूर्ण होते. द्विदल वनस्पतीमध्ये संवर्धक पदर ग्रंथीत असल्यामुळे वाढ पूर्ण अशी कधी होत नाही. कारण संवर्धक पदरापासून नवीन पेशी उत्पन्न होतात, म्हणून द्विदल वनस्पतीमध्ये मुळांची रुंदी ही थोडथोडी अधिक वाढते. पण एकदलामध्ये मुळे अधिक रुंद न होतां त्यांस तंतुमय ( Fibrous ) आकार येतो. एकदलामध्ये मुळ्यांत भेंडाच्या पेशी जाड कातडीच्या असून त्या अधिक कठीण व चिंवट होतात.

 एकदल वनस्पतीची मुळे तपासण्याकरितां मक्याची तंतुमय मुळे मका पेरून तयार करावीत. ती सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहिली असतां वरील प्रकारची व्यवस्था त्यांत दिसेल.

 जुन्या मुळांत खोडाप्रमाणे कवच ( Bark ) वाढते. परिवर्तुळाजवळ संवर्धक शक्ति उत्पन्न होऊन बाहेरील अंगास कॉर्क पदर व आंतील अंगास दुसरे पदर उत्पन्न होतात. कॉर्क पदराचे बाह्यांगाचा अंतरसंबंध तुटल्यामुळे तो भाग वाळू लागतो. संवर्धक शक्ति कांहीं काल नाहीशी होऊन पुनः कांहीं दिवसांनी ती आंतील पदरांत उत्पन्न होते. त्यामुळे पूर्वीसारखे पदर पुनः उत्पन्न होतात, होता होता हे पदर ग्रंथींमधील तंतुकाष्ठापर्यंत मुद्धां पोहोंचतात.