पान:वनस्पतिविचार.pdf/103

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


९ वे ].     अंतररचना.( Tissue).     ७५
----- प्रथम बाह्यत्वचा ( Epidermis) दृष्टीस पडते, ती एकपेशीमय असून त्यापासूनच वरील केंस उत्पन्न होतात. बाह्यत्वचेनंतर साल (Cortex) आढळते. येथील पेशी मृदुसमपरिमाणी असून आंतील अंगांस अंतरत्वचा ( Endodermis ) असते. अंतरत्वचेतील पेशींच्या भित्तिका जाड असतात. वाटल्यास आयडीनचा उपयोग करून पहावा, म्हणजे सात्विक कणामुळे ती निळसर दिसू लागेल. अंतरत्वचेनंतर स्तंभ (Stete ) दिसतो. स्तंभांत प्रथम परिवर्तुल (Pericycle ) एक अगर दोन पदरी आढळते. मुळांतील परिवर्तुळ अधिक महत्त्वाचे असते. कारण त्यापासून दुय्यम मुळ्या उत्पन्न होतात. परिवर्तुळांत कांहीं पेशी संवर्धक होऊन त्या बाहेरील अंगाकडे लंबदिशेत वाढू लागतात. संवर्धक पदराची पूर्ण सांखळी होण्यास परिवर्तुळाचा उपयोग होतो. परिवर्तुळानंतर आंत वाहिनीमय जालें (Vascular bundles ) असतात. प्राथमिक मुळांत ती केवल काष्ठाची अथवा तंतुकाष्ठाची असतात. संवर्धक पदर ( Cambium) प्रथम तेथे असत नाहीं. काष्ठ व तंतुकाष्ठ यांचे दरम्यान संयुक्त जाल Conjunctive tissue असते. पुढे जेव्हां पूर्ण ग्रंथी तयार होते, त्यावेळेस संवर्धक पदर संयुक्तजालापासून उत्पन्न होतो. संयुक्त जालें, काष्ठ अगर तंतुकाष्ठ ग्रंथींच्या डोक्यावर असणाऱ्या परिवर्तुळाकडून एकमेकांस जोडिली जातात, त्यामुळे संयुक्त जालांस अर्धवट नागमोडी वर्तुळाकृति येते. मध्यभागी भेंड ( Pith ) असते.

 काष्ठग्रंथीची रचना विशेष पाहण्यासारखी असते. परिवर्तुळाकडील बाजूस काष्ठाच्या पेशी वाटोळ्या व लहान असून भेंडाकडे ह्या मोठमोठ्या आढळतात. ह्या लहान पेशी प्रथमकाष्ठाच्या (Protoxylem) असून मोठ्या पेशी नूतन काष्ठाच्या असतात. म्हणजे कोंवळ्या मुळांत प्रथमकाष्ठ बाह्यांगास परिवर्तुळाजवळे असून, नवीन काष्ठाचे पदर आंत वाढत जातात, ह्याचे उलट खोडामध्ये काष्ठाची वाढ असते. मुळ्या व खोड ह्यांच्या वाढीसंबंधी हा भेद प्राथमिक स्थितीमध्ये स्पष्ट असतो. पण जसे जसे मूळ मोठे होत जाते, त्याप्रमाणे हा भेद कायम राहत नाही. त्यांतील ग्रंथी केवळ साध्या न राहता, पुढे निश्चित होत जातात. संयुक्तजालापासून संवर्धकपदर काष्ठ व तंतुकाष्ठ ह्या दोहोंमध्ये वाढतो. काष्ठवाढीची दिशा पूर्वीप्रमाणे अंतरवर्धिष्णु ( Endogenous ) न राहतां काष्ठाची वाढ बहिवर्धिष्णु होऊ लागते.