पान:वनस्पतिविचार.pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८ वे ].     पेशीजाल. ( Tissue).     ७३
-----

मऊ (Soft ) व कठिण ( Hard ) असे दोन प्रकारचे पदर तंतुकाष्ठांत असतात. मऊ तंतुकाष्ठ संवर्धक पदराजवळ असून त्यापासूनच त्याची उत्पत्ति होत असते. येथील पेशी मूदु समपरिमाणी (Parenchymatous ) असतात. ह्यामध्ये पुढे चाळणीदार नळ्या (Sieve tubes ) उत्पन्न होत जातात. ग्रंथाच्या बाह्य बाजूकडे कठिण तंतुकाष्ठ असते. ह्याच्या पेशी लंब असून जाड कातडीच्या असतात. काष्ठाप्रमाणे फिरकीदार, वळेदार वगैरे वाहिन्या नसून फक्त मृदुभागांत चाळणीदार नळ्या असतात. पेशीवर पेशी रचून मध्य पडदे पूर्णपणे न गळतां छिद्रमय होऊन त्यास चाळणीदार आकार येतो.

 संवर्धक पदरांतील पेशी द्विधा होत गेल्याकारणाने पेशींची संख्या अधिक होऊन काष्ठ व तंतुकाष्ठ ही दोन्ही वाढतात. म्हणूनच द्विदलधान्य वनस्पति अधिक अधिक रुंद होत जाते. संवर्धक पदर एकदल वनस्पतींत नसल्यामुळे खोडाची रुंदी वाढत नाहीं.

 कधी कधी तंतुकाष्ठांचे पदर ग्रंथीमध्ये दोन्ही टोंकास असतात. म्हणजे प्रथम तंतुकाष्ठ, नंतर संवर्धक पदर व पुढे काष्ठ असून पुनः तंतुकाष्ठ असते, ग्रंथीत काष्ठांचे दोन्ही अंगास तंतुकाष्ठ असते. दोडके, भोपळा, कारली वगैरे जातीच्या वेलांत असली रचना असते.

 तसेच काष्ठ ( Xylem ) व तंतुकाष्ठ परस्पर एकमेकाच्या बाजूस न आढळतां कधी कधी काष्ठाभोंवतीं तंतुकाष्ठ अथवा उलट तंतुकाष्ठाभोंवती काष्ठ माढळते. जसेः-दर्शना, फर्न, दर्शनामध्ये ग्रंथाच्या मध्यभागीं तंतुकाष्ठ असून सभोंवतीं काष्ठाचे वेष्टण असते, व फर्नमध्ये सभोंवतीं तंतुकाष्ठ असून मध्यभागी काष्ठ असते.

 खरोखर ग्रंथी सालीच्या पेशीजालात बुडालेल्या असतात. एकदल वनस्पतींत ग्रंथी भेंडाळभागांत बुडून जातात. तसेंच द्विदलवनस्पतींत मध्यभागी भेंड असून बाह्यांगास साल असते. म्हणजे ग्रंथी ह्या दोहोंमध्धे आढळतात.

---------------