पान:वनस्पतिविचार.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

नाहीसे होऊन त्यास संकीर्ण स्वरूप येत जाते, व अशाच रीतीनें ग्रंथी उत्पन्न होतात. ग्रंथी म्हणजे संवर्धक पेशींपासून अन्यरूप पावलेला विशिष्ट प्रकारच्या पेशींचा पुंजका होय. ह्या पुंजक्यांत कांहीं काष्ट ( Xylem ) व तंतुकाष्ठ ( Phloem ) पदर असतात. ह्या दोन्ही पदरांमध्ये संवर्धक पदर ( Cambium ) असून त्या योगाने नवीन नवीन पेशी दोन्ही बाजूस उत्पन्न होतात. कांहीं ग्रंथांमध्ये संवर्धक पदर असत नाहीं. असल्या ग्रंथास जें एकदा कायम स्वरूप येते त्यांमध्यें अधिक फरक पडत नाहीं. एकदल धान्य वनस्पतींत ग्रंथीं वरील प्रकारच्या आढळतात. येथील ग्रंथीस कायम स्वरूप प्राप्त झाल्यावर अधिक काष्ठ अगर तंतुकाष्ठ उत्पन्न होत नाहीं. संवर्धक पदर, काष्ट व तंतुकाष्ठ उत्पन्न करण्यांत खर्चून नाहीसा होतो. द्विदल वनस्पतीच्या खोडांत हा पदर नेहमी आढळतो. मात्र ऋतुमानाप्रमाणे त्याची संवर्धक शक्ति अधिक तेजस्वी अगर मंद असते. त्यामुळे काष्ठावर मंद अथवा तेजशक्तीची द्योतक चिन्हें राहतात. त्यास काष्ठावरील वार्षिकवर्तुळे (Annual rings ) म्हणतात.

 प्रत्येक ग्रंथीमध्ये मुख्य दोन भाग असतात. १ काष्ठ ( Xylem ) व २ तंतुकाष्ठ ( Phloem ) ह्या दोन्हींमध्ये वर सांगितलेला संवर्धक पदर ( combium ) असतो. ग्रंथांसभोंवती पेशींचे म्यान असते. म्यानांतील पेशी जाड असतात. काष्ठ पदर आतील बाजूस असुन बाह्यांगास तंतुकाष्ठ पदर असतात.

 काष्ठ पदर विशेष करून लंबवर्धक पेशीचे बनलेले असतात. पेशींची कातडी लांकडी होऊन त्यांत टणकपणा अधिक येतो. वाहिन्या (Vessels ) व तंतू ( Wood--Fibre ) असे दोन वेगळे भाग काष्ठांत असतात. तंतूच्या पेशी अरुंद, दीर्घ व उघड्या तोंडाच्या असून त्यांत रसादि पदार्थ असत नाहीत, मध्यभागाकडे असणाऱ्या भेंडा (Pith ) जवळ प्रथमकाष्ठ (Protoxylem) असते. ह्यांत वाहिन्यांचा अधिक भरणा असतो. वाहिन्यांची उत्पत्ति पेशींवर पेशी येऊन मध्य पडदे नाहीसे झाल्यामुळे होते. तसेच ज्या प्रकारच्या पेशींपासून ज्या वाहिन्या तयार होतात, त्यांस तोच आकार येतो. फिरकीदार (Spiral ) वळेदार ( Annular ) वगैरे वाहिन्या येथेच असतात, लांकडी तंतुमय भागामध्ये वाहिन्या जणू बुडून गेलेल्या असतात.