पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/७२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


६२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

मुंबईच्या आसपास तर दाहा बारा रुपयेपर्यंत उत्पन्न येते. नारळांतील खोबऱ्याचे उपयोग सर्वांना महशूर आहेतच, ते सांगण्याची आवश्यकता नाही. खोबऱ्याचे तेल काढितात त्यास ' खोबरेल ' असे म्हणतात. या तेलाचा अलीकडे साबण व मेणबत्त्या करण्याकडे उपयोग करू लागले आहेत. लोखंडी यंत्रे साफ करण्याकरितां या तेलाचा उपयोग होतो. खोबऱ्याचा ( ओल्या अगर वाळलेल्या ) कीस दोन तासपर्यंत उन्हांत सुकवून अगर तव्यावर थोडावेळ तापवून तो पिळून जें तेल काढितात त्यास 'मुठेल ' असे म्हणतात. मुठेल मस्तकास चोळल्याने त्यास थंडावा येतो. कोणत्याही प्रकारच्या घायावर मुठेल लाविल्यानें घाय बरे होतात. चिंव्या, वस्तरा वगैरे उतल्यास खोबरें उगाळून अगर जाळून लावितात. नारळाच्या शेंडीची राख मधांतून दिली असतां उचकी व वांतीचा विकार नाहीसा होतो. पाण्याचा नारळ घेऊन त्यास भोंक पाडितात त्यांत मीठ भरून बाहेरून माती लावून वाळवून शेणीच्या विस्तवांत भाजतात; नंतर त्याचे बारीक चूर्ण करून ठेवतात; यास 'नारीकेल क्षार' असे म्हणतात. हे चूर्ण पिंपळीचे चूर्णाबरोबर शक्तिमानाप्रमाणे दिल्यास वात, पित्त, कफ, सन्निपात यांपासुन झालेला शूल यांजवर दिलें असतां गुण येतो, असे या झाडाचे अनेक औषधी उपयोगही आहेत.

--------------------
४० केवडा.

 केवड्याची झाडे पुष्कळ ठिकाणी बहुधा आपोआपच होतात. अल्लिबाग, रत्नागिरी, मालवण, राजापूर, कर्नाटक वगैरे ठिकाणी ही झाडे पुष्कळ आहेत. या झाडाची मोठमोठाली बेटे असतात. या झाडामध्ये पांढरा व पिवळा अशा दोन जाती आहेत. पांढऱ्या जातीस केवडा व पिवळीस केतकी असे म्हणतात. केतकीला केवड्यापेक्षां ज्यास्त वास येतो. केवड्याच्या झाडाला दोन अडीच हात लांबीचे पान येते. या पानाच्या दोन्ही बाजूस तीक्ष्ण काटे असतात. केवड्याच्या पानांच्या रसांत जिरें वांटून त्यांत साखर घालून तो रस सात दिवसपर्यंत घेतल्यास उष्णतेपासून होणारे सर्व प्रकारचे रोग नाहींसे होतात. हे औषध चालू असतां पथ्याकरितां ताकभात अळणी खाल्ला पाहिजे. केवड्याची मुळी पाण्यात उगाळून त्यांत खडीसाखर घालून तो रस दिला असतां रक्तप्रदराचा विकार नाहीसा होतो. गुरांना मुसक्या म्हणून जो रोग होतो, त्यावर केवड्याच्या कांद्याचा रस पाजल्याने गुण येतो. अशा प्रकारचे या झाडाचे आणखीही कांहीं औषधी उपयोग आहेत. आता या झाडाचे व्यापारसंबंधी काय उपयोग आहेत, त्याबद्दल विचार करू.