पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मी ह्या छोटेखानी पुस्तकांत आपल्या देशांत सामान्यतः सर्वत्र उत्पन्न होणाऱ्या ठळक ठळक अशा ४० वनस्पतींपासून नेहमीच्या उपयोगाचे असे कोणते जिन्नस कसे तयार करावयाचे, याची माहिती देण्याचा यथामति प्रयत्न केला आहे, व प्रत्येक वनस्पतीचा औषधाचे काम कसा उपयोग होतो, हें थोडक्यांत संस्कृत वैद्यकाचे आधार देऊन सांगितले आहे.

 ह्या लहानशा पुस्तकाचे लक्ष्यपुर्वक आणि सप्रयोग अध्ययन करणाऱ्या माणसास आपल्या कुटुंबांतील किरकोळ आजार डॉक्टरांच्या अथवा वैद्याच्या मदतीवांचून सहज बरे करता येतील, आणि कुटुंबांतील माणसांच्या मदतीने तुटपुंज्या भांडवलावर घर बसल्या एखादा लहानसा धंदा काढून आपला चरितार्थ चालविता येईल, अशी अनुभवावरून खात्री वाटते.

 हे पुस्तक प्रसिद्ध करण्याच्या कामी इंदुप्रकाशाचे चालक रा. रा. दामोदर सांवळाराम यंदे यांनी जें सहाय्य केले ते केले नसते तर मला ते प्रसिद्ध करतांच आलें नसते. त्यांच्या साह्यानेच हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

 हे पुस्तक वाचून वाचकांपैकी एकाला जरी उपरि निर्दिष्ट फलप्राप्ति झाली. तरी संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि गुजराथी अशा अनेक ग्रंथांचे अवलोकन करून हे पुस्तक लिहिण्याच्या कामीं मी जे परिश्रम घेतले, त्याचे सार्थक झालें असे मला वाटेल. असो, शेवटी ज्या जगचालक प्रभूच्या कृपेने माझा हा अल्प यत्न सिद्धीस गेला, त्याला अनन्यभावें प्रणाम करून मी हा प्रास्ताविक लेख येथे पुरा करितों,

    महाड, ता० २० मार्च

     १९१३.        लेखक.