पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      वेळू.      ४९

-----

कमज्यास्त घालतात, आणि तारेचा विणलेला पत्रा एका चौकटीत बसवलेला असतो. ती चौकट दोन्ही हातांत धरून त्या हौदांतील पाण्यात बुचकळून वर कांढतात. म्हणजे पाणी तेवढे तारांतील भोकावाटे गळून जाते व कुटयाचा थर त्या पत्र्यावर बसतो; तोच कागद होय. नंतर तो कागद काढून एका फडक्यावर किंवा बुरणसाच्या तुकड्यावर टाकतात. याप्रमाणे एकावर एक बरेच कागद रचले म्हणजे त्याजवर फडके घालून वर लाकडाची फळी ठेवून तीवर वजनाकरितां मोठमोठे दगड ठेवतात. या वजनाने त्यांतील थोडेसे पाणी निचरून गेले म्हणजे वरील दगड काढून टाकतात. आणि फळीनें कागदाचा गठ्ठा दाबितात. नंतर त्यांतील एकेक कागद सोडवून भिंतीवर थापून वाळवितात. वाळल्यानंतर त्यास गव्हाची खळ बुरणसाच्या फडक्याने लावितात. आणि वाळल्यावर लाकडाचा उत्तम पॉलिश केलेला तक्ता घेऊन त्यावर तो कागद हांतरतात आणि मोठमोठ्या कवड्यांनी किंवा गुळगुळीत अशा अकिक नांवाच्या दगडांनी घोटून तकाकी आणितात. म्हणजे कागद तयार झाला. इंग्लडमध्येही हाताने कागद करण्याची रीति बहुतेक वरील प्रमाणेच आहे. फरक इतकाच की, आपल्या इकडे कागद वाळण्याकरिता भिंतीवर चिकटवून ठेवतात, व इंग्लंडमध्ये कागद दोरीवर वाळत घालतात. तसेच इंग्लंडमध्ये गव्हाचे खळीऐवजी सरसाचे खळीचा उपयोग करतात. आणि कागद ग्लेझ करण्याकरिता कवड्यांऐवजी पॉलिश केलेल्या तांब्याच्या पत्र्याचा उपयोग करतात. असो, अशाप्रकारे आपल्या नेहमीच्या परिचयांतली जी 'वेळू 'वनस्पति तिचे गृहकृत्यांत व व्यापारसंबंधांत किती महत्वाचे उपयोग आहेत, याची कल्पना वरील विवेचनावरून वाचकांना सहज होण्यासारखी आहे. आता या वनस्पतीचे एक दोन औषधी उपयोग सांगून हें प्रकरण परें करूं.' वंशलोचन' म्हणून जो पदार्थ वेळूच्या आतल्या भागांत सांपडतो, म्हणून वर उल्लेख केला, त्या वंशलोचनाचे वैद्यकशास्त्रांत शेकड़ों उपयोग सांगितले आहेत, कास, क्षय, श्वास इत्यादि विकारांवर अत्यंत गुणावह असे जे सीतोपलादि चूर्ण करितात, त्यांत हे वंशलोचन मुख्य आहे.

  सीतोपला षोडश स्यादृष्टौ स्याद्वंशलोचना ।
  पिप्पली स्याच्चतुःकर्षा स्यादेला च द्विकार्षिकी ॥
  एककर्षस्त्वचः कार्यश्चूर्णयेत्सर्वमेकतः ।
  सीतोपलादिकं चूर्ण मधुसर्पिर्युतं लिहेत् ॥
      ' शार्ङ्गधर '