पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


      कपिल किंवा कुंकुमफल.      ३७

-----

मिळवील. उदाहरणार्थ, लग्नसमारंभासारख्या हौशांचे समारंभांत ज्या पत्रावळी वापरावयाच्या, त्यांवर यजमानाच्या मनातून नूतन वधूवरांची नांवे घालावयाची असल्यास, कुशल मनुष्य केवळ चोंयांच्या टाक्यांनी सदर नांवे यजमानांच्या इच्छेप्रमाणे पत्रावळीवर काढू शकेल, व अशा पत्रावळींना हजारी चार दोन रुपये तरी भाव खात्रीने ज्यास्त मिळेल. पत्रावळी करणे त्या फणसाच्या, वडाच्या, मोहाच्या, माहुलीच्या, पळसाच्या किंवा कुंभ्याच्या पानांच्या कराव्या; ही पाने टिकाऊ असतात. पळसाच्या फुलापासून नारिंगी रंग होतो. रंगपंचमीचे दिवशी पुष्कळ लोक ही फुलें पाण्यात उकळवून रंग तयार करतात व एकमेकांच्या अंगावर रंग उडविण्याचे काम याच रंगाचा उपयोग करतात. याशिवाय पळसाच्या झाडाचा दुसराही एक व्यापारसंबंधी उपयोग आहे. पळसाच्या झाडाच्या चिकापासून गोंदासारखा एक पदार्थ तयार करितात. आपल्या इकडे त्याचा उपयोग सुती कपडे रंगविण्यासाठी करितात. या गोंदाला हिंदी भाषेत 'कुअरकुसळ ' व इंग्रजीत 'किनो' अशी नावे आहेत. या पळसगोंदांत शेकडा सुमारे ७० भाग ट्यॉनिक अ‍ॅसिड असते. यामुळे रंग देण्यास व कातडी कमाविण्यास याचा चांगला उपयोग होतो. पळसाच्या झाडाच्या बुंध्याला त्रिकोणावर चिरा पाडिल्या, म्हणजे त्यांतून एकप्रकारचा चीक निघतो; तो वाळविला म्डणजे त्यापासूनच वर सांगितलेला दुधासारखा पांढरा, ठिसूळ, तुरट व रांपट असा ' किनो' गोंद तयार होतो.

--------------------
३१ कपिल किंवा कुंकुमफल.

 कपिल हें हिंदी भाषेतील नांव आहे. संस्कृतात यात कुंभ, पुन्नाग, सुरपुन्नाग इत्यादि वेगवेगळी नावे आहेत. वनस्पतिशाखांत या झाडास (Rottlera Tinctoria) रॉटलेरा टिंक्टोरिया व मराठींत सुरंगी किंवा गोडी उंडण असेही म्हणतात. ही झाडे हिंदुस्थानांत बऱ्याच ठिकाणी आढळतात. उंडण आणि सुरंगी ही एकाच वर्गातली झाडे आहेत. यांची पाने लांबट बदामी आकाराची असतात. या झाडाला हिवाळ्याच्या सुमाराला फुले येतात व नंतर फळे येतात. याच्या फळावरील व पानावरील बारीक भुगा खरडून तो चाळणीने चाळून कपिल या नांवाने बाजारात विक्रीकरितां ठेवतात. याचा उपयोग विशेषतः रेशीम रंगविण्याकडे होतो. कपिलाचा रंग पक्का बसण्याकरितां त्यांत दंशक पदार्थ घालण्याची जरूर नाहीं. कपिलाच्या वजनाच्या निम्मे पापडखार घेऊन तो पाण्यांत विद्रुत करून त्यांत कपिलाची पूड टाकिली म्हणजे रंग तयार होतो. नुसत्या भुकटीचा रंग काळसर विटकरी असतो. पाण्यांत आल्केली मिसळून त्यांत कपिलाची भुकटी घालून ते मिश्रण कढविले म्हणजे उत्तम रंग तयार होतो.