पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


४०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

टाकलेल्या कोळशाचे पुडीवर ठेवून हाताने उदबत्ती वळावी व सावलीत वाळत ठेवावी. सगळ्या उदबत्त्या सावलीत चांगल्या वाळल्यावर मग त्यांस उन्हें द्यावी. उन्हाचा ताप जितका बसेल तिकके चांगले; त्यामुळे वास खुलतो. ओली उदबत्ती उन्हांत घालू नये. घातल्यास चिरा पडतात. तीनचार उन्हें दिल्यानंतर उदबत्त्यांचे निरनिराळ्या वजनाचे पुडे बांधून विक्रीस ठेवावे. या उदबत्तीला बाजारांत दोन रुपयेपर्यंत भाव येतो. यापेक्षां उंची उदबत्ती करावयाची असेल, तर त्यांत कस्तुरी वगैरे जिन्नस घालावे लागतात. वाळ्याच्या मुळ्यांशिवाय त्याच्या गवताचाही उपयोग फार आहे. या गवतानें छपरे शाकारितात, जाड़ पातीच्या केरसुण्या व कुंचे करतात; शिवाय कोवळ्या गवताची गुरांना चांगली वैरण होते. काळ्या वाळ्याची वैरण तर गुरे फारच आवडीने खातात. जुनाट झाल्यावर मात्र हे गवत गुरांना निरुपयोगी होते. वाळ्याच्या या वैरणीमध्ये एक विशेष गुण आहे; तो असा की, या गवताची गंज चांगली रचून ठेवली, तर हे गवत दहा बारा वर्षांपर्यंत टिकते व दुष्काळासारख्या खडतर प्रसंगी गुरांना त्यांचा चांगला उपयोग होतो. दुभत्या जनावरांनी हे गवत खाल्ले तर त्यांच्या दुधाला वाळ्याचा वास येतो. वाळ्याच्या उत्पन्नाने जमीन नापीक होते; याकरितां वाळा लावण्यास पङजमिनी उपयोगात आणणे बरे. काळा वाळा तर निर्जल जमिनीत सुद्धा होतो. हा काळा वाळा रक्तशुद्धि करणारा असून, खोकला, धनुर्वात, अग्निमांद्य वगैरेवर गुणकारी आहे. धनुर्वात व संधिवात या विकारांत घाम घेण्याकरितां याचा विशेष उपयोग करतात.

--------------------
२८ डाळिंब.

 डाळिंबीचे झाड सर्वांच्या माहितीतील आहे. त्यासंबंधाने विशेष वर्णन द्यावयास नको. मुंबई इलाख्यांत काठेवाड, भावनगर व धोलका येथे उत्तम डाळिंबे होतात; तथापि अरबस्थानांतील मस्कत येथील डाळिंबांसारखी डाळिंबे आपल्या देशांत होत नाहींत. मस्कत येथील डाळिंबांत एक विशेष आहे; तो असा की, त्याची साल जरी वरून अगदी वाळलेली अशी दिसते. तरी आंतील दाणे अगदी ताजे टवटवीत असतात. तसेच दाण्यांतील बी फार बारीक व अगदी नरम असते. डाळिंबेच्या झाडांत दोन जाति आहेत. एका जातीच्या झाडांना फक्त फुलेच येतात, त्यास गुलनार असें नांव आहे. दुसऱ्या जातीच्या झाडांना फळे येतात. फळे येणाऱ्या झाडांत दोन पोटजाती आहेत. एका जातीच्या फळातील दाणे पांढरे व दुसऱ्या जातीच्या फळांतील दाणे तांबडे असतात. डाळिंबीचे मूळ, पान, साल, फूल, व फळांची साल या सर्वांचे वैद्यकशास्त्रात अनेक उपयोग सांगितले आहेत. ग्रीक आणि रोमन लोक तर पूर्वी डाळिंबीचे