पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना
---------------

वाचकही आपला हा हिंदुस्थानदेश म्हणजे उद्भिज्ज संपत्तीचे केवळ माहेरघर आहे. विंध्य, सह्य, सातपुडा, हिमालय, इत्यादि नगपंक्तींनी विराजमान झालेली ही आर्यभूमि म्हणजे अखिल जगांतील वनस्पतींची जणू काय जन्मदात्री माताच आहे. पृथ्वीच्या इतर भागांत अशी एकही वनस्पति नाहीं की, जिची निपज हिंदुस्थानांत होत नाही. निरनिराळ्या प्रकारची धान्ये, वेगवेगळ्या तऱ्हेच्या शाकभाज्या, अनेक प्रकारची फळफळावळे, इमारती लांकडे, शेकडों प्रकारची गवतें, वेत, कळक वगैरेसारखी तंतुमय काष्ठेंं, गळिताचीं धान्ये, कापूस, ताग, वगैरे सारख्या वस्त्रोपयोगी वनस्पति, नानाप्रकारच्या औषधि सर्व कांही हिंदुस्थानांत उत्पन्न होते. आमची ही आर्यमाता एका हाताने जशी आम्हांला अशा रीतीने उद्भिज्ज संपत्तीचा भरपूर पुरवठा करीत आहे, तशीच ती आपल्या दुसऱ्या हाताने आम्हांला विपुल खनिज संपत्तीचा परवठा करीत आहे. अशा वैभवशाली आणि उदार मातेच्या उदरीं जन्म मिळाल्याबद्ल आम्हांला अभिमानच वाटला पाहिजे.

 वर लिहिल्याप्रमाणे उद्भिज्ज आणि खनिज संपत्तीने परिपूर्ण अशा हिंदुस्थानांत जन्म पावून आमच्या पदरी अठरा विसवे दारिद्र्य असावें ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. अथवा आलस्यांत कालक्षेप करून आपल्या ईश्वरदत्त बुद्धीमत्तेचा दुरुपयोग करणारे लोक दारिद्यपंकांत आकंठ रुतून राहिले तर त्यांत आश्चर्य तरी कसले ? आमच्या देशांत उत्पन्न होणारा हा विपुल कच्चा माल परदेशांतीळ धाडसी व्यापारी आपल्या देशांत नेतात आणि तेथील कल्पक त्याच मालाचे हजारों उपयोगी जिन्नस बनवून ते इतर देशांप्रमाणेच आमच्या देशांत पाठवून त्यापासून मिळणाऱ्या द्रव्याने सधन बनतात. सारांश आमचे दारिद्र्य हे आमच्याच आळसाचे आणि अज्ञानाचे फळ आहे, त्याबद्दल दुसऱ्यास दोष देणे रास्त नाहीं.