पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

म्हणजे आवळकटी, चित्रक, बाळहिरडे, पिंपळी व सैंधव ही पांच औषधे समभाग घेऊन त्यांचे चूर्ण करून घेतले असतां सर्व प्रकारचे ज्वर दूर होतात. आवळीचे आंतल्या सालीचा रस तीन तोळे काढून, त्यांत मध व हळदीची पूड घालून घेतला असतां प्रमेहाचा विकार नाहींसा होतो; या झाडाचे अनेक औषधि उपयोग आहेत. आवळीच्या बियांची बारीक भुकी करून ती दुधांत अगर पाण्यात कालवून डोकीला लावण्याची हिंदू स्त्रियांची चाल आहे. हिच्या योगाने मस्तकास थंडावा येऊन केस मृदू होतात. आंवळ्यांना पाड लागला म्हणजे ते झाडावरून उतरून त्यांचा मोरआवळा करितात; मोरावळा स्वादिष्ट असुन पित्तशामक आहे. आंवळ्याचे लोणचें करितात, ते फार दिवस टिकत नाही, परंतु आंवळ्याच्या वड्या किंवा आंवळ्याची कोचकई म्हणून जो पदार्थ करितात, तो रुचकर व पाचक असून पुष्कळ दिवस टिकतो. आवळेवड्या किंवा कोचकई खाली लिहिलेल्या रीतीने करतात. चांगले इरसाल आंवळे घेऊन शिजवावे; नंतर त्यातील बिया काढून त्याची टरफले बारीक वाटावी. नंतर त्यांत जिरें, मिरची अथवा मिरी, सुंठ, सैंधव, पादेलोन, मीठ हे जिन्नस वाटून घालावे व त्याच्या वड्या थापून वाळवाव्या. कित्येक लोक जेवण झाल्यानंतर सुपारीएवजी या वडीचा उपयोग करतात. तेणेकरून तोंडास रुचि येते. आवळ्याचे तेल काढितात, त्यास आवळेल असे म्हणतात. खोबरेलाऐवजी हे तेल मस्तकास चोळल्याने त्यास थंडावा येऊन कपाळ दुखणे वगैरे विकार नाहीत होतात, आंवळ्याची शाई व काळा रंगही होतो.

--------------------
२७ वाळा.

 वाळा ही तृणवर्गातील वनस्पति आहे. वाळ्याचें बेट एकदां झालें म्हणजे ते बरेच वर्षे टिकते; आणि म्हणनच वनस्पतिशास्त्रांत "बहुवर्षायू " वनस्पतीत याचा समावेश केलेला आहे. कारोमांडल किनारा, बंगाल इलाखा, ब्रह्मदेश, संयुक्त प्रांत वगैरे भागांत या गवताची उत्पत्ति फार होते. कटक प्रांतामध्ये तर बहुतेक सर्व पडजमिनीत या गवताची आपोआप वाढ होते. आपल्या इकडे मात्र या गवताचे विशेष उत्पन्न नाही, तरी कांही हौशी लोक आपल्या मळ्यांतून याची बेंटे मुद्दाम लावितात. वाळ्यामध्ये पांढरा व काळा अशा दोन जाती आहेत. काळा वाळा कराचीकडे विशेष होतो. वाळ्याचा फांट ज्वरावर देतात. फांट करण्याची रीतः-वाळा जाड़ा भरडा कुटून त्याच्या वजनाच्या तिप्पट कढत पाण्यात बारा तासपर्यंत मडक्यांत भिजत घालून ठेवावा, नंतर तें पाणी चांगले ढवळून वस्त्राने गाळून घ्यावे. पित्तविकारावर वाळ्याचे चूर्ण गुणावह आहे. उष्णतेने अंगाचा दाह होत असल्यास, वाळ्याची उटी अंगाला