पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      आंवळी.      ३७

-----

पडते. पिकलेलें केळे मधांत कालवून खाल्ल्यास कामीण बरी होते. केळीचा कांदा कंबरेस बांधल्याने अडलेली स्त्री लवकर प्रसूत होते. प्रसूत झाल्याबरोबर कांदा सोडुन टाकावा. केळीची कोवळी पाने भाजलेल्या जागी बांधल्यास दाह कमी होतो. पिसाळलेले कुत्रे चावलें असतां रानकेळीचे बी पोटांत देतात व जखमेवर वाटून बांधतात. रानकेळीच्या पानांची राख एक मासा व मध एक तोळा ही एकत्र करून दिल्यास उचकी बंद होते. अशाच प्रकारचे केळीच्या झाडाचे आणखीही कांही औषधि उपयोग आहेत.

--------------------
२६ आंवळी.

 आंवळीचे झाड आपल्या इकडे आबालवृद्धांस ठाऊक आहे. तेव्हां त्याबद्वलची विशेष ओळख करून द्यावयास नका. आंवळीमध्ये रायआंवळी, साधी आंवळी, रान आंवळी व पान आंवळी असे. चार भेद आहेत. आंवळीचे लाकूड कणखर असून पाण्यात कुजत नाही, आंवळीचे लाकडांत व फळांत टॉनिक अॅसिड पुष्कळ असते, यामुळे याच्या कषायाचा उपयोग कातडी कमविण्यासाठी व कात करण्यासाठी होतो. हा आंवळीचा कात पांढऱ्या रंगाचा असतो. आंवळीचा कात करण्याची कृति खेराचा कात करण्याचे कृतीसारखीच आहे. खैराचा कात करण्याची कृति मागे अठराव्या भागांत 'खैर ' या प्रकरणांत दिली आहे, ती पहावी. आंवळीच्या झाडाला जी फळे येतात, त्यांस आंवळे असे म्हणतात. आंवळे सुकविले म्हणजे त्यांची आंवळकटी होते. आवळकटीचे आणि आंवळ्यांचे अनेक औषधि उपयोग वैद्यकशास्त्रांत सांगितले आहेत. हिरडा, बेहडा आणि आवळकटी या तीन पदार्थांस वैद्यकशास्त्रांत त्रिफळा अशी संज्ञा आहे. आवळकटी जाळून ती तेलांत खलून लावल्यास खरूज बरी होते. आवळकटीचे चूर्ण केळीच्या कांद्याच्या रसांत दिल्याने आम्लपित्ताचा विकार नाहीसा होतो. चार मासे आवळकटी रात्रौ कल्हईच्या भांड्यांत भिजत घालून ठेवावी, दुसरे दिवशी ती वाटून गाईच्या पावशेर निरशा दुधांत कालवून, त्यांत खडीसाखरेची पूड तीन तोळे व जिऱ्याची पूड दोन मासे घालून, ते मिश्रण सतत सेवन केल्यास पित्तशमन होते; व घेऱ्या, अरुचि, कपाळ दुखणे वगैरे विकार साफ नाहीसे होतात. सर्व प्रकारच्या ज्वरांवर आमलक्यादि चूर्ण गुणावह असल्याचे सालील श्लोकावरून दिसून येते.
  आमलकं चित्रकः पथ्या पिप्पली सैधवं तथा ।
  चूर्णितोऽयं गणो ज्ञेयः सर्वज्वरविनाशनः ॥
      'शार्ङ्गधर.'