पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

जामिनीत दोन लांब उभे पुरुन त्यावर चार फूट लांब, चार इंच जाड, व सहा इंच रुंदीचें एक आडवें लांकूड बसविलेले असते व या लाकडावर एक बोथटशी सुरी तिची धार खाली करून बसविलेली असते. सुरीच्या मुठीला एक दोरी बांधलेली असून, दोरीचे दुसरे टोंक एका लांबशा बांबूला बांधलेले असते. तेणेकरून पायाने दाबून काम करतांना सुरी उचलता येते. या यंत्राची किंमत तीन रुपये आहे. थोड्या दिवसांच्या अनुभवाने एक मनुष्य रोज या यंत्रावर दहा केळीच्या सोपटांचा वाख काढू शकतो. सोपटाच्या दीड दीड इंचांच्या चिरफळ्या करण्याकरितां व इतर तऱ्हेने मदत करण्याकरितां वगैरे त्याच्या मदतीला एक मुलगा दिला म्हणजे बस्स आहे. एका केळीच्या झाडापासून सुमारे दीड पौंड वाख निघतो. एका गड्याची व मुलाची मिळून रोजची मजुरी आठ आणे धरून व रोज पंधरा पौंड वाख निघेल असे मानून, हिशेब केल्यास एक टन वाख काढण्याला सुमारे पंचाहत्तर रुपये खर्च येईल. गठ्ठे बांधणे, वाहतुक, व्यापारबट्टा, विमा वगैरे बाबींबद्ल टनाला सरासरी पंचेचाळीस रुपये खर्च येतो म्हणजे एक टन वाख लंडनचे बाजारांत जाऊन पडेपर्यंत सुमारे एकशेवीस रुपये खर्च येतो. लंडनचे बाजारांत या वाखाला तीनशे रुपये टनपर्यंत भाव येतो. या बाजारभावांत थोडा चढ-उतार होणे शक्य आहे. तथापि सरासरीच्या मानाने हिशेब करितां असे निष्पन्न होते की, टनामागे एकशे ऐशी रुपये नफा राहील. वरील हिशेब केळीचे खुंट फुकट मिळतील, अशा समजुतीने केलेला आहे, परंतु एक टन वाख काढण्यास लागणाऱ्या पंधराशें खुंटांची किंमत तीस रुपये धरली, तरीही टनामागे दीडशे रुपये निव्वळ फायदा राहील.”

 सारांशरूपाने वर दिलेल्या उताऱ्यावरून आपणांस अगदी निरुपयोगी वाटणाऱ्या केळीच्या सोपटापासूनही केवढा महत्त्वाचा उपयोग होत असतो व व्यापारी दृष्टीने केळीची सोपटें किती फायदेशीर आहेत, याची कल्पना होईल.

 चवेण म्हणून केळीची जी एक रानटी जात सांगितली, तिचीहि पाने जेवणाच्या उपयोगी पडतात. केळीप्रमाणेच चवेणीच्या काल्याची व केळफुलाची भाजी होते. चवेणीची केळी मात्र खाण्यासारखी नसतात. कातकरी वगैरे लोक चवेणीचे कांदे वाळवून, त्याच्या पीठाच्या भाकरी करून खातात.

 केळीच्या सोपटाचे पाणी काढून ते तीन ते पांच तोळे घेऊन त्यांत पातळ केलेलें तूप १ ते २ तोळे मिश्र करून पाजल्यासं, मूत्राघाताचा विकार बरा होतो. या औषधाचा असा चमत्कार आहे की, केळीच्या पाण्याशी तुपाचा संयोग होऊन पोटांत गेलेले तूप मूत्रद्वारे फार त्वरित निघून जाते व त्यायोगाने मूत्र द्वार मोकळे होऊन लघवी मुटते. पुरुषापेक्षां स्त्रियांना हे औषध लवकर लागू