पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

      केळ.      ३५

-----

तात. केळ लाविल्यापासून सुमारे बारा महिन्यांनी विते व पुढे सुमारे तीन महिन्यांनी केळी पिकावयास लागतात. लोंगर चांगले असेल, तर एकेका लोंगरांत तीनशेपर्यंत केळी असतात. केळफुलाची, काल्याची व हिरव्या केळ्यांची भाजी करितात. हिरव्या केळ्यांच्या कापट्या करून वाळवितात. त्या बरेच दिवस टिकतात. या कापट्या कुटून त्यांचे पाठ करतात. त्यांच्या भाकरी सुद्धा होतात. पिकलेली केळी खाण्यास उपयोगी पडतात. त्यांची निरनिराळी पक्वान्ने करितात. राजेळी म्हणून जी जात आहे, त्या जातीची केळीं सुकवून ‘सुकेळीं' करितात. वसईजवळ आगाशी येथील लोकांचा सुकेळीं तयार करणे हा एक धंदाच आहे. या धंद्यावर तेथील शेकडों लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. केळ्यांशिवाय या झाडाचे दुसरेही पुष्कळ महत्त्वाचे उपयोग आहेत. आणि त्यांसंबंधानेच या भागांत विशेष माहिती सांगावयाची आहे. भोजनसमारंभांत केळीच्या पानांचा व द्रोणांचा किती उपयोग होतो, हे सर्वांना ठाउकच आहे. आमच्या या देशांत सुवर्णपात्राप्रमाणे केळीच्या पात्राची योग्यता मानिली जाते. पुणे-मुंबई सारख्या मोठाल्या शहरानजीकचे लोक केवळ पानांकरितांच केळीच्या झाडांची लागवड करून त्यांवर शेंकडों रुपये मिळतात. केळीच्या पानांचे दांडे ( ताटोळे ) वाळवून जाळले असता त्यापासून जी राख होते, तीमध्ये क्षार असल्यामुळे साबणाऐवजी कपड़े धुण्याकडे तिचा उपयोग करतात. केळीची वाळलेली सोंपटें तपकीर वगैरे जिनसांचे पुडे बांधण्याकरितां उपयोगांत आणतात. धनगर व कोष्टी लोक सोपटें जाळून त्यांची राख सुत रंगविण्याकरितां घेतात. बंगाल्याकडे तर कित्येक गरीब लोक मिठाऐवजी या राखेचा उपयोग करतात, असे म्हणतात. केळींची सोपटें हत्ती मोठ्या आवडीने खातात. केळीच्या ताज्या जाड सोपटांचे पाणी काढून त्यांत पापडाचे पीठ भिजविण्याची चाल आपल्या देशांत पुष्कळ ठिकाणी आहे. केळीच्या या रसाचा 'मार्किंग इंक ' प्रमाणे काळा रंगही तयार करतात. अशा प्रकारचे या झाडापासून अनेक उपयोग आहेत. याशिवाय व्यापारसंबंधी या झाडाचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे सोपटापासून जे धागे निघतात, त्यांचे दोर, कागद व कापड करण्याचे जे निरनिराळे प्रयोग करून पाहण्यांत आले, त्यांचा निकाल समाधानकारक होऊन, त्याचें कांहीं कापड तर रेशमापेक्षाही चांगले दिसत होते; अशा तऱ्हेचे रिपोर्ट हल्ली प्रसिद्ध झाले आहेत. केळीचा वाख काढण्याची जी कृति नुकतीच कांहीं मासिकांतून व वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाली आहे. तिचा सारांश आम्ही आपले वाचकांकरितां यासाठी देत आहों.  " केळीच्या सोपटांचें वास काढण्याचे एक यंत्र उटकमंडचे प्राउडलॉकसाहेब यांनी शोधून काढले आहे. या यंत्राची रचना अगदी साधी आहे.