पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


२८.      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

निम्में पाणी आटले म्हणजे मातीच्या उथळ परळांत ओतून पुन्हा कढवितात, सुमारे एक-तृतीयांश द्रव शिल्लक राहिला म्हणजे, ते परळ एक दिवसपर्यंत थंड जागेत ठेवितात. नंतर दुसरे दिवशीं परळ उन्हांत ठेवून तो द्रव वरचेवर ढवळतात. अशा तऱ्हेने तो द्रव बराच घट्ट झाला म्हणजे, जाड खादीवर पसरतात, व दोरीने त्याच्या वड्या कांपतात. खास कात चिकटू नये म्हणून द्रव खादीवर ओतण्यापूर्वी त्या खादीवर गाईच्या शेणीची राख पसरून ठेवितात. हा कात रंगाच्या, कांतडी कमाविण्याच्या वगैरे कामांत उपयोगी पडतो. खाण्याकडे या काताचा उपयोग करीत नाहीत. बाजारांत हा काळा कात या नावाने विकतात. हा ठिसूळ, काळसर तपकिरी रंगाचा असून याला वास नसतो. चवीला हा कात तुरट असून कढत पाण्यांत विद्राव्य आहे. वर सांगितल्याप्रमाणे लांकडांचा द्रव नियमित मर्यादेपर्यंत आटवून मग आटविण्याची क्रिया बंद करितात, व त्या द्रवांत झाडाच्या फांद्या घालून ठेवितात, म्हणजे त्या फांद्यांवर द्रवांतील कात थिजून जमतो. हा कात फिक्कट व पांढरा असुन त्याचा उपयोग खाण्याकडे व औषधाकड़े करतात.

--------------------
१९ शाळू ( जोंधळा. )

 आमच्या इकडे देशावर व गुजराथ वगैरे प्रांतांत मुख्य उत्पन्न म्हटले म्हणजे जोंधळ्याचे. जोंधळा या धान्याचे उपयोग सर्वांना महशूर आहेत. त्या संबंधाने येथे काही सांगावयाचे नाही. येथे फक्त जोंधळ्याच्या ताटांचा एक विशेष उपयोग सांगावयाचा आहे. जोंधळ्याची कणसे काढून घेतल्यानंतर जी ताटें राहतात, त्यांचा उपयोग गुरांचे वैरणीकडे होतो, त्यास कडबा असे म्हणतात. अमेरिकेत या ताटांचा उपयोग साखर करण्याकडे करतात. तिकडे हे कारखाने दिवसेंदिवस ज्यास्त भरभराटीस येत आहेत. आमच्या इकडे गुजराथप्रांती जोंधळ्याच्या ओल्या ताटांचा रस काढून तो साखरेऐवजी खिरींत घालितात, यावरून इकडील जोंधळ्याच्या ताटांतही अमेरिकेतील ताटाइतकीच गोडी असली पाहिजे, हे उघड आहे. करितां आमच्या इकडील विद्वान् लोकांनी या कामांत लक्ष घालून जोंधळ्याच्या ताटापासून साखर करण्याचा प्रयत्न करून पाहिल्यास यश आल्यावांचून राहणार नाही, अशी आमची खात्री आहे. जोंधळ्याप्रमाणेच मक्याच्याहि ताटांचा उपयोग साखर करण्याच्या कामी होतो. जोंधळ्याचे किंवा मक्याचे ताटाचा साखर करण्याकडे उपयोग केल्यास माणसाचे किंवा गुराचे पोटावर पाय येण्याचा मुळीच संभव नाही. कारण कणसे भरल्याशिवाय जोंधळा व मका चरकांत घालण्याच्या स्थितीत येतच नाही. तसेच यातील साखरेचा अंश काढून घेतल्यानंतर जी चिपाडे राहतात, त्यांचा वैरणी-