पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

अंशाची उष्णता मिळाल्याने गंजेच्या अंगचे विष साफ नाहीसे होते. व्हिनीगर दोन भाग, साखर तीन भाग आणि लिंबाचा रस एक भाग, या सर्वांचे मिश्रण गुंजांचे विष उतरण्याला देतात. गुंजेच्या मुळीचे चूर्ण व सुंठीचे चूर्ण एकत्र करून खोकल्यावर देतात. टक्कल पडलेल्या जागीं गुंजांचा रपटा लावल्याने पुन्हां केस येतात. गुजराथेत गुंजेला ‘चणोठी' असे नाव आहे. त्या प्रांतीं ‘चणोठी पाक' या नावाचा पांढऱ्या गुंजांचा पाक तयार करतात. पांढऱ्या गुंजा भरडून त्यांची डाळ तयार करतात, नंतर त्या डाळीवरील भूस पाखडून टाकुन डाळ दळतात. गुंजांच्या या पांच शेर पिठांत पांच शेर दूध घालून ते शिजवून त्याचा खवा तयार करतात. नंतर साखरेचा पाक करून त्यांत तो खवा, वेलची, जायफळ, वगैरे पदार्थ घालून ढवळतात; म्हणजे चणोदीपाक तयार झाला. हा पाक वीर्यपौष्टिक आहे. असे या वनस्पतींचे अनेक औषधि उपयोग आहेत. आपल्या इकडे वजन करण्याच्या कामी गुंजांचा उपयोग करतात, हे सर्वांना ठाऊकच आहे. एक गुंज सुमारे पावणेदोन ग्रेन वजन भरते. जगविख्यात 'कोहिनूर हिरा प्रथम गुंजा घालूनच वजन केला होता असे म्हणतात. गुंजांत ‘रती ' असेही म्हणतात. या रती शब्दावरूनच आरबी भाषेत ' किरात' हा शब्द झाला, व त्यावरून इंग्रजीमध्ये ‘क्यारट ' ( सोने, हिरे वगैरे मौल्यवान जिन्नस तोलण्याचे वजन ) हा शब्द झाला असावा, असे काही ग्रंथकारांचे मत आहे. एक क्यारट वजन म्हणजे जवळ जवळ दोन रती किंवा ३/ ग्रेन होतात. लहान मुले व कांहीं रानटी जातीचे लोक गुंजांच्या माळा व कर्णभूषणे करून अंगावर घालतात. गुंजांच्या माळा करून त्या गळ्यांत चालण्याची चाल बरीच प्राचीन असावी, असे 'वनसुधेतील ' वामनपंडितांच्या खालील उताऱ्यावरून दिसून येते.

  स्वकौशल्य ज्या गुंजमाळांत नाना ।
  गळां घालिती ते करीती तनाना ॥
  शिरीं बांधती मोरपत्रे विचित्रे ॥
  शरीरावरी रेखिती दिव्य चित्रे ॥
      'वनसुधा.'
 श्रीकृष्ण परमात्मा गोकुळांत नंदगृही असतां नंदाची गुरे राखावयास रानांत गेल्यावेळी आपल्या संवगड्यांबरोबर त्यांनी ज्या अनेक बाललीला केल्या, त्या लीलांचे हे वर्णन आहे. लहान लहान पेट्या, टोपल्या, सुपल्या, वगैरे जिनसांवर गुंजा निरनिराळ्या आकृतीमध्ये बसविल्याने त्या जिनसांना विशेष शोभा यऊन त्यांनी किंमतही चांगली येईल, तरी हौशी मनुष्याने हा प्रयत्न करून पहावा.

--------------------