पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/३२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


२२      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

फार उपयोगी आहे. तो फार थंड असल्यामुळे वाटल्यास शीत प्रकृतीच्या माणसाने या वस्तूंचा फारसा उपयोग करू नये. या कापसाच्या अंगी स्थितिस्थापकता हा गुण विशेष असल्यामुळे कपाशीच्या कापसाप्रमाणे वर दाब पडल्यावर हा गोळा होत नाही. पांढऱ्या सांवरीच्या कापसांतील बियांचे तेल निघते. गरीब लोक या बिया खातात. यावरून याचे तेलही खाण्याजोगें असेल असे वाटते. पांढऱ्या सांवरीचे लाकूड चामडी रंगविण्याचे उपयोगी पडते. पांढऱ्या सावरीचा मूठभर कोवळा पाला वाटून तो ताकांत मिश्र करून रोज सकाळी घेतल्यास नवीन जडलेला परम्याचा विकार जातो. तामिली लोक पांढऱ्या सांवरीची झाडे आपल्या देवालयाभोंवतीं लावितात. बालेघाटाकडील रानटी लोक सांवरीच्या फुलांच्या कळ्या खातात. तिकडे दरसाल सुमारे पांच हजार मण फुलांच्या कळ्या खाण्याकडे खपतात, असा एके ठिकाणी उल्लेख आहे.

--------------------
१५ गुंजवेल.

 गुंजांचा वेल असतो. या वेलाला चिंचेच्या पानांसारखी लांबट व लहान पाने येतात. या वेलांना पांढऱ्या गुलाबी व काळ्या रंगाची फुले येतात. त्यांना लहान लहान शेंगा येऊन त्यांत गुंजांची उत्पत्ति होते. गुंजांमध्ये मुख्य तीन जाती आहेत. पहिली-बिया तांबड्या असून एका अंगास काळा ठिपका असतो. या जातीच्या वेलांना तांबड़ी फुले येतात. दुसऱ्या जातीच्या वेलांची फुले व बिया पांढऱ्या असतात. तिसऱ्या जातीच्या बिया काळ्या असून वर पांढरा ठिपका असतो व या वेलाला फुलें काळी येतात. पूर्वी गुंजेच्या वेलाच्या मुळ्या व्यापारी लोक जेष्ठमधाच्या मुळ्या म्हणून बाजारांत विकीत असत; परंतु अलीकडे हा प्रघात बराच कमी झाला आहे. आणि याचे कारण गुंजेच्या मुळीला जेष्ठमधाच्या मुळीपेक्षां गोडी कमी असते हे होय, असे डॉक्टर बिडी साहेबांचे म्हणणे आहे. गुंजांच्या या मुळ्या काष्ठमय, वक्र, पुष्कळ फाटे फुटलेल्या आणि सुमारे अर्धा इंच जाडीच्या असतात. त्यांची साल पातळ तांबूस रंगाची असून लांकुड पिवळट पांढरे असते. त्याला रुचि प्रथम कडू व मग गोड असते. वरील तिन्ही जातींपैकी पांढऱ्या गंजेच्या मुळीला गोडी ज्यास्त असते, आणि म्हणूनच या मुळ्यांचा जेष्ठमधाचे मुळ्यांऐवजी विशेष खप होत असे. गुंजवेलाचे च गुंजांचे अनेक औषधी उपयोग आहेत. मोहराच्या कढत तेलांत गुंजेची पाने भिजवून ती संधिवाताने सांधे धरलं असतील, त्यावर बांधतात. शरीराचा एखादा भाग सुजून दुखत असेल, तर प्रथम त्यावर थोडें एरंडेल लावून गुंजेची पाने ऊन करून बांधतात. मेंदूसंबंधी विकारावर गुंजा पोटांत देतात. आणि त्वचारोग, व्रण,