पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


      अननस.      १३

-----

ओतून जें रंगांचे पाणी खाली गळते, त्यांत एक तोळा हळदीची पूड आणि वीस तोळे लिंबाचा रस मिसळतात, या मिश्रणांत पागोटें भिजवून पिळतात. नंतर पूर्वी एकीकडे ठेवलेल्या लाल रंगांत सुमारे पक्का पाऊणशेर म्हणजे साठ तोळे लिंबाचा रस मिसळून त्यांत पागोटे बुडवून काढून पिळून वाळवितात. रंग चांगला लाल झाला नाही असे वाटल्यास, पुन्हा एकवार पागोटे त्या रंगाचे पाण्यांत बुडवून चाळवितात. अशाच तऱ्हेनें गुलाबी, प्याजी, मोतिया, वगैरे निरनिराळे रंग पागोट्यांस देतात. मात्र प्रत्येक रंगाचे वेळी फुलांचे व लिंबाच्या रसाचे प्रमाण वेगवेगळे असते. गुलाबी रंग देणे असेल तर हळदीची पूड घालावी लागत नाही.

--------------------
८ अननस.

 अननसाचे झाड केतकीच्या झाडासारखें, परंतु लहान झुबकेवजा असते. हे झाड बऱ्याच लोकांना ठाऊक आहे; परंतु फळाशिवाय या झाडाचा दुसरा उपयोग फारच थोड्या लोकांस माहीत असेल. हिरवे अननस रुचिकर, हृद्य, गुरु, कफपित्तकारक, अरोचक व श्रमनाशक असतात, तेच पिकले असतां गोड, पित्तनाशक आणि उन्हापासून झालेले विकार यांचा नाश करणारे असतात. अननस चांगले पक्व झाल्यावर साल सोलून गाभ्याशिवाय मगजाच्या कापट्यांस साखर, मिरपूड व मीठ लावून खाल्ले असतां फार चवदार लागतात. अशक्त गरोदर स्त्रियांनी या जास्ती खाल्ल्यास गर्भपात होतो असे म्हणतात. अननसाचा मुरंबा करतात. अननसाच्या झाडाच्या पातींचे बारीक रेशमाप्रमाणे फार बळकट धागे निघतात. आपल्याकडे याबद्लचा विशेष प्रयत्न कोणी केलेली नाही. परंतु जावा वगैरे बेटांतून याचे धागे काढण्याचे अनेक कारखाने आहेत. या धाग्यांपासून निरनिराळ्या प्रकारची मौल्यवान वस्त्रे तयार करतात, आपल्या इकडे कांही थोड्या ठिकाणी याचे धागे काढितात. व या धाग्यांचा घायपातीच्या दोराप्रमाणे मंगळसूत्र वगेरे ओवण्याचे काम उपयोग करतात. कारण हे रोज भिजले तरी कुजत नाहीत, पातीचे धागे काढण्याचे काम फार सोपं आहे. पात, फळीवर अगर पाटावर घेऊन ती बोथट सुरीने खरडावी म्हणजे धागे मोकळे होतात ते काढून घ्यावे. नंतर पात उपडी घालून दुसऱ्या बाजूचेही धागे पूर्ववत् काढून घ्यावे. काढलेल्या धाग्यांना पातींतील मगज लागलेला असतो तो पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. आणि धागे उन्हांत सुकवावे. धागे काढण्याची दुसरीही एक रीत आहे. ती अशीः - पाती कांही वेळ उन्हात वाळवाव्या म्हणजे आंतील रस थोड़ा सुकतो. नंतर या पाती पाण्यात भिजवून मोगरीने हळू हळू ठेचाव्या, म्हणजे आंतील धागे