पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात 'अश्वत्थः सर्ववृक्षाणाम् ' अशा तऱ्हेने हे दोन्ही वृक्ष पूजनीय असल्याकारणाने आमच्यांतील लहान थोर स्त्रीपुरुषांस यांची पूर्ण ओळख आहे. उपरि निर्दिष्ट केलेल्या झाडांचे जर कोणी लक्षपूर्वक अवलोकन करील, तर त्यात कधी कधी सदर्हू झाडांच्या कांहीं कांहीं फांद्या तांबड्या रंगाने माखल्या आहेत, असे दिसून येईल. तरी हा प्रकार काय आहे, याजबद्दलची थोडीशी माहिती या भागांत वाचकांना करून देण्याचा विचार आहे.

 वड, पिंपळ, पाइर, नांद्रुक, वगैरे झाडांच्या फांद्यांवर 'कोकस-लाका ' (Coccus-Lacca) नांवाचे एका जतीचे बारीक किंडे असतात. हे किडे सुईच्या अग्राएवढे लहान असतात. परंतु सदर झाडांच्या फांद्यांवर त्यांची असंख्य प्रजा वाढून त्या योगाने त्या फांद्या अगदी आच्छाद्न जातात. या किड्यांच्या शरीरांतून एक चिकट पदार्थ बाहेर पडत जाऊन सर्व किड्यांवर त्याचे आच्छादन होते. नंतर त्यावर हवेचे कार्य घडून ते कठीण बनते, व यामुळेच त्या फांद्या तांबड्या दिसू लागतात. यांतच लाखेची उत्पत्ति आहे. या कवचांतील किडे बाहेर जाण्यापूर्वीच त्या फांद्या तोडून आणून उन्हांत वाळवितात, म्हणजे आंतील किडे मरतात. नंतर फांद्यांवरील तो तांबड़ा पदार्थ खरडून काढितात. याला कच्ची लाख असे म्हणतात. फार लाल रंगाची जी कच्ची लाख असते, ती रंगाच्या कामास उपयोगी पडते आणि फिक्कट रंगाची भोके असलेली व्हार्नीसें वगैरे करण्यास उपयोगी पडते. लोकर रंगविण्यास, लाकडावर रंग चढविण्यास व कातडी रंगविण्यास कच्च्या लाखेचा उपयोग करतात. याशिवाय तुरटी, लाख व चिंचेचे पाणी, या तिहींच्या मिश्रणाने सुती कापडाला किरमिजी रंग देण्याचा प्रघात आहे.

 अनिलाइन रंग निघाल्यापासून लाखेचा रंगाच्या कामी फारसा उपयोग होत नाहीं. हल्ली मोहरेची लाख, व व्हार्निसें करण्याचे काम याच लाखेचा उपयोग होतो. कच्ची लाख ठेचून ती पापडखाराच्या पातळ द्रवांत भिजत घालतात, म्हणजे त्यांतील लाल दुव्य विद्रुत होते. हा द्रव आटवून वड्या तयार करितात, व तो लाखी रंग म्हणून विकावयास पाठवितात; त्यांतून जो अविद्राव्य शेष राहील, तो वाळवून चपडी लाख म्हणून विकतात. ही लाख कापडाच्या पिशवीत घालुन ती पिशवी विस्तवावर धरतात, लाख वितळली म्हणजे तो रस गुळगुळीत् दगडाच्या फरशीवर पाडतात. नंतर फळीने दाबून तिचे पातळ पत्रे बनवितात. हिलाच पत्री लाख असे म्हणतात.

--------------------