पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

तून व साधारण प्रतीच्या शहरांतून सुद्धा पावसाळ्यांत प्रत्येकाच्या परसांत निदान पांच पन्नास तरी भेंड्याची झाडे लाविलेली असतात; परंतु भाजीपलीकडे त्या झाडांचा कोणी उपयोग करून घेत नाही. भेंड्याच्या झाडांचा वाख काढून घेतल्यानंतर ज्या सणकाड्या राहतात. त्यांचे लहान लहान तुकडे पाडून त्यांची टोके गंधकांत बुडवन ठेवावी, म्हणजे बीनखर्चात आगकाड्यांप्रमाणे विस्तव पेटविण्याचे कामी त्यांचा उपयोग होतो.

--------------------
५ मांदार व रुई.

 मांदार व रुई ही झाडे एकाच वर्गातली असून या दोहोंमध्ये विशेष फरक नाही. मांदाराचे झाड पांढरे व भुरकट असते, त्यास पांढरी फुलें येतात आणि रुईच्या झाडाला पांढरी जांभळट फुले येतात. यापेक्षां या दोन्ही जातीच्या झाडांत फारसा भेद नाहीं. रुईच्या झाडाला हिंदधर्मशास्त्रांत बरेच महत्त्व आहे. एखाद्या पुरुषाला तिसरा विवाह कर्तव्य असेल, तर त्याने प्रथम अर्कविवाह ( रुईच्या झाडाशी लग्न ) करुन नंतर इच्छित वधूशी विवाह करावा असे धर्मशास्त्र आहे. आणि याची सत्यता खालील उताऱ्यावरून वाचकांच्या लक्षांत येईल.

  त्रिलोकवासिन् सप्ताश्व छायया सहितो रवे ।
  तृतीयोद्वाहजं दोष निवारय सुखं कुरु । १ ।।
तसेंचः-
  नमस्ते मंगले देवि नमः सवितुरात्मजे ।
  त्राहि मां कृपया देवि पत्नी त्वं म इहागता ।।
  अर्क त्वं ब्रह्मणा सृष्टः सर्वप्राणिहिताय च ।
  वृक्षाणामधिभूतस्त्वं देवानां प्रीतिवर्धनः ।।
  तृतीयोद्वाहजं पापं मृत्यु चाशु विनाशय ।।
      'धर्मसिंधु'
 अर्कविवाहामुळे रुईच्या झाडाला धर्मशास्त्रात कसे महत्त्व आले आहे, याची कल्पना वाचकांना वरील उताऱ्यावरुन होण्यासारखी आहे. तसेच हिंदू म्हणविणाऱ्या कांहीं जातींत विवाहसमयीं वधूने वराला रुईच्या फुलांची माळ घालण्याची रूढी असल्याचेंहि वाचकांना माहीत असेलच. धर्मशास्त्राप्रमाणेच वैद्यशास्त्रांतही रुईचे झाडाला पुष्कळ महत्त्व आहे. रुईची पक्की पाने व सैधव यांची भट्टी लावून त्यापासून तयार होणाऱ्या औषधीचा दमावर चांगला उपयोग होतो.