पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----
टांकळा.

 टांकळा ही वनस्पति विशेषतः कोकण प्रांतीं तर मुलांबाळांना सुद्धां माहीत आहे. पावसाळ्यांत गांवाच्या खतारीला व इतर ठिकाणी याची हजारों झाडे दरसाल उगवतात व वाढतात, आणि मार्गशीर्ष महिना आला म्ह्णजे जागच्याजागीं सुकून जातात. याच्या कोवळ्या पाल्याची भाजी, हाच काय तो याचा उपयोग कोंकणप्रांतांतील बहुतेकांस ठाऊक आहे. टाकळा ही सूर्य विकासिनी, वनस्पति आहे. म्हणजे सूर्यास्तास तिची पाने मिटतात, व सूर्योदयाचे वेळी ती मोकळी होतात. पावसाचे दिवसांत ज्या वेळी सूर्य अभ्राच्छादित असतो, त्या वेळी खेडेगांवांतील लोकांचे टांकळा हे एक घड्याळच आहे. टांकड्याची पाने मिटू लागली म्हणजे गुराखी मुलें सूर्यास्ताची वेळ नजीक आली, असे समजून आपले गुरांचे कळप घराकडे आणण्याच्या तयारीस लागतात, व शेतकरी लोक आपली शेतांतील कामे आटोपून घरी येण्याची तयारी करू लागतात, अशा तऱ्हेने खेडेगांवांतील लोकांना टांकळा ही वनस्पति घड्याळाप्रमाणे उपयोगी पडते. आमच्या देशी वैद्यकांतही टांकळ्याचे बरेच उपयोग सांगितले आहेत. टाकळ्याच्या अंगीं कफ, कुष्ठ, कृमी, दमा, ज्वर, मेह, खोकला वगैरे विकार बंद करण्याचे गुण आहेत. करंजाच्या बिया, टाकळ्याचे बी व कोष्ठ ही गोमुत्रांत वाटून त्यांचा लेप केला असतां कुष्ठनाश होतो, असे वाग्भटांत सांगितले आहे. या वनस्पतीचे दुसऱ्याही कांहीं रोगांवर अनेक उपयोग सदर ग्रंथांत सांगितले आहेत; पण या वनस्पतीचा व्यापारासंबंधी कसा उपयोग होण्यासारखा आहे, त्याबद्लचा येथे विचार करूं.

 चहापानाप्रमाणेच कॉफी-पानाचाही प्रघात आपल्या देशांत बराच वाढला आहे. सन १८९५ साली दोन लक्ष एक्यांयशी हजार एकर जमीन कॉफीचे पिकाकरितां गुंतली होती. आता यापैकी बरीच कॉफी परदेशी रवाना होते, हें जरी खरे आहे; तरी आपल्या देशांतही कॉफीचा खप कमी होतो असे नाही. अंगांतील सुस्ती व आळस घालवून रक्तवृद्धि करणे आणि जाग्रणापासुन होणारे उपद्रव कमी करणे, हे जे कॉफीच्या अर्काचे गुणधर्म तेच किंबहुना त्यापेक्षाही कांहीं ज्यास्त गुणधर्म टांकळीच्या बियांच्या अर्काचे अंगी आहेत.

 कार्तिक, मार्गशीर्ष या महिन्याच्या सुमारास टाकळीची झाडे सुकू लागतात, त्या वेळी सदर्हू झाडे कापून आणावी, (झाडे उपटू नयेत, कारण उपटल्याने टाकळीच्या शेंगा जास्त वाळलेल्या असल्यास आंतील बी गळून खाली पडण्याचा संभव असतो.) नंतर ती झाडे दोन चार दिवस उन्हात चांगली