पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

वाचता यावे, समजावे, मशिनने तिकिट काढता यावे, फोन करता यावा, बँकेतील मशीनद्वारे पैसे काढणे-ठेवणे, स्वतंत्रपणे सहलीस जाणे, सप्ताहकालीन शिबिरे इत्यादी प्रकारे या मुलांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. अशा प्रयत्नात शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाच्या मर्यादेत असते. येथील शिक्षक, प्रशिक्षक मुलांशी ज्या संयम, सौजन्याने, अनौपचारिकपणे वागत असतात ते पाहिले की आपल्याकडील अशा शाळांतील शिक्षणात मातृत्व व भ्रातृत्व विकसित करण्यास भरपूर वाव असल्याची जाणीव होते.
 अति मतिमंद मुलांच्या शिक्षण व्यवस्थेत वैद्यकीय, शारीरिक, मानसिक उपचारांवर भर अधिक असतो. मेंदू, स्नायू, मज्जातंतू, विकासाच्या कितीतरी उपचार सदनिका या शाळेत होत्या. प्रत्येक विभागात तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती. या विभागांची शरीरोपचार, मनोचिकित्सा, मनोचिकित्सा, वाचाविकार निराकरण, स्नायू नियंत्रण विभाग अशी विभागणी करण्यात आली होती.
 याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शाळेत काही सामूहिक सोयी होत्या. उदाहरणार्थ रंजनकक्ष. त्यात चित्रपट, व्हिडिओ कॅसेटस् इत्यादी ऐकण्या, पाहण्याची सोय होती. एक मुक्त छंद केंद्र होते. चित्रकला, हस्तव्यवसाय, जोडकाम इत्यादी सोय होत्या. एक खेळणी घर होते. बागेत असणारी घसरगुंडी माती ऐवजी छोट्या छोट्या प्लास्टिक, रबरच्या चेंडूंनी वेढलेली आढळली. चौकशी करता समजले की खेळ हादेखील उपचार पद्धतीचा एक भाग मानला जातो. स्नायू विकास केंद्राच्या शिक्षकांनी ती मुद्दाम बनवून घेतली होती.
 या शाळेचा सर्व परिसर हिरवळीने घेरलेला होता. जागोजागी ट्युलिपच्या रंगीबेरंगी फुलांचे ताटवे. जागोजागी सौंदर्यसृष्टीचा परिचय देणारी रचना. सुहास्यवदन शिक्षक, धडधाकट मूल म्हणून भारतात शिकण्यापेक्षा मतिमंद म्हणून युरोपात शिक्षण अधिक सुख देणारे वाटले. मतिमंद मुलांच्या युरोपातील शाळा दोन प्रकारच्या आहेत. निवासी व अनिवासी. निवासी शाळांची कल्पना त्यांना मान्य नाही. मूल घरच्या वातावरणात वाढले तर त्याचा बौद्धिक विकास सहज व गतीने होते अशी त्यांची धारणा आहे नि ती बरोबर आहे. उपचार सातत्य आवश्यक असलेल्या मुलांसाठीच ते निवासी शाळा पसंत करतात. या शाळा दोन्ही प्रकारच्या आहेत. शासकीय व खाजगी. खाजगी शाळांना शासन आपल्या संस्थांइतकेच अनुदान देते. भेदाभेद नाही. शासन नागरिकाकडून सामाजिक सुरक्षा योजनेसाठी कर गोळा करते. तेथील स्थानिक स्वराज्य सरकार अशा संस्था चालवितात.

वंचित विकास जग आणि आपण/९८