पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मतिमंदांच्या निवासी शाळांचे शिवधनुष्य आपण जोवर उचलायला तयार होणार नाही व शोध, सल्ला, उपचार, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन असे एकछत्री सेवाकेंद्र सुरू करणार नाही तोवर आपले काम जगाच्या तुलनेते मलमपट्टीचे ठरते हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडे साधनांची उणीव जशी

आहे तशी योजकता, कल्पकता, ध्यासाचीही उणीव आहे, हे अंतर्यामी आपण मान्य केले पाहिजे. हा लेख जपानचे वैभव दाखविण्यासाठी नसून आपण कल्याणाची जपानदृष्टी घेण्याच्या उद्देशाने लिहिला आहे. याकडे टीकालेख म्हणून कृपया पाहू नये. साच्यामागे आपण ज्या मतिमंद मुला-माणसांचे काम करतो त्यांच्या आपण अधिक जवळ सेवा, सुविधा, संवाद, संवेदनाद्वारे जावे असे मनस्वी वाटते.
 विनाअनुदान तत्त्वावर साधनहीन शाळा काढणे म्हणजे मतिमंदांची फरफट करणे आहे. शासन गंभीर नक्कीच नाही. कार्यकर्त्यांना याचे पूर्ण भान यायला हवे. मतिमंदांच्या शाळा मिळकत केंद्र नव्हे किंवा पती-पत्नीची भागीदारी संस्थाही नव्हे. समाजाच्या पैशावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासायची केंद्रे होणा-या आपल्याकडील सामाजिक संस्थांनी लाभार्थी केंद्री कार्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यायला हवा. प्रत्यक्ष काम करणा-या शिक्षक-कर्मचा-यांची प्रतिष्ठा ही संचालक वर्गापेक्षा अधिक मानण्याची मनोवृत्ती आपल्याकडे विकसित व्हायला हवी. तर मग आपण आहे त्या स्थितीतही भरपूर करू शकतो, याचा साक्षात्कार होईल. तो साक्षात्कार आपणा सर्वाना व्हावा । इतक्याच माफक अपेक्षेने हा लेख प्रपंच. क्षमस्व!

◼◼


वंचित विकास जग आणि आपण/९४