पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

करायची. एक मतिमंद मुलांचे सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करायची तर दुसरी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारी व प्रशिक्षण देणारी होती. या संस्थेत कितीतरी संस्था व सेवांची सोय होती. आठ मजली प्रचंड इमारत. सर्व एकाच वेळी पाहणे अशक्यच. “शिनोकी गकुएन' या दोन्ही मतिमंद विद्यालयाची क्षमता प्रत्येकी ५0 होती. एकत्रित विचार केला तर जवळपास तितकेच कर्मचारी त्यांच्या दिमतीला होते.
 क्योटो शहरातील भेटीत अपंगांचे पुनर्वसन केंद्र पाहिले. पुढे नारा शहरातील ‘तोडाजी सेन्शेन' ही संस्था पाहिली. ‘क्योटी सिटी चाइल्ड वेल्फेअर सेंटर मुलांसाठी मार्गदर्शन, तात्पुरता निवारा, मनोचिकित्सा, सल्ला, शोध, प्रतिपालन, प्रतिबंधात्मक काळजी, बालरोग, शरीरोपचार, अस्थिशास्त्र क्रिया, मज्जाशास्त्र क्रिया, दिवसाचे देखभाल केंद्र, मतिमंद, मूक, अपंग बालकांचे उपचार केंद्र एकाच ठिकाणी चालवत असल्याचे पाहून जपानी लोकांच्या योजकतेचा मला हेवाच वाटू लागला. अपंग मुलांना पुन्हा त्यांचे नैसर्गिक बालपण देण्याचा या केंद्राचा आटापिटा, आपण येथवर पोहोचू शकू का? अशी साधार शंका निर्माण करणारा.
 कृपया आपण या लेखाकडे जपानची केलेली भलावण, स्वप्नरंजन, अतिशयोक्ती वर्णन अशा उथळपणे पाहू नये, असे मला गंभीरपणे सुचवावेसे वाटते. विदेशी सेवा, सुविधा याकडे आपण केवळ आश्चर्याने पाहतो व स्वप्नरंजन करत राहतो. संस्था, समाज, शासन तिन्ही स्तरावर आपले अज्ञान आपण दूर केले पाहिजे. संस्थांनी आपण फार मोठे सामाजिक काम करतो, हेच चिक्कार, अशा अभिनिवेशातून मुक्त व्हायला हवे. संस्थाप्रमुख व कर्मचारी यातील दर्जाची दुही वा दरी कमी करून सहकारी भाव आला पाहिजे. संस्था हे कुटुंब मानण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी. कामाची द्विरुक्ती टाळायला हवी. मतिमंदांच्या कल्याणाचे कार्य आपल्याकडे शोध, नोंद, शिक्षण, प्रशिक्षण या पुरतेच मर्यादित आहे. प्रतिबंधन, उपचार, पुनर्वसन, सामान्यीकरण या महत्त्वाच्या अंगांना आपण स्पर्शसुद्धा केलेला नाही. आपल्या आजवरच्या कार्यातील ही त्रुटी आहे.
 पालकांचे प्रशिक्षण (पालक सभा घेणे नव्हे) हा देखील सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे. जपान इतकी सुविधांची रेलचेल आपण नाही करू शकणार. पण सुविधांचे जाळे जोडता येऊ शकेल. याबाबत विचार सुरू व्हायला हवा. एकाच प्रकारचे काम करणाच्या संस्थांत सुसंवाद असणे गरजेचे आहे. त्यातून आपणास द्विरुक्ती टाळता येऊन सेवा वैविध्य जोपासता येईल.

वंचित विकास जग आणि आपण/९३