पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 ‘वंचित विकास : जग आणि आपण' हे पुस्तक काहीसे तांत्रिक व काहीसे भावसाक्षर करणारे असले, तरी समाजभान असलेल्या प्रत्येकाने ते वाचायला हवे. प्रत्येक घर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनाथश्रम, वृद्धाश्रम होत असल्याच्या काळात घरोघरी असंवादाची स्थिती निर्माण होते आहे. मुलांचे प्रेक्षक होणे, स्त्रियांचे ‘भावोजींमागे केवळ साडीच्या अमिषाने वेडे होणे, वाहिन्यांवरील कार्यक्रमांतून विवाहपूर्व, विवाहोत्तर संबंधाचं उदात्तीकरण यातून समाज दुभंगतो आहे, उद्ध्वस्त होत आहे. प्रत्येक माणसास वंचित ठरवणारे जागतिकीकरण आपल्यातील प्रत्येकाचा चिंतेचा विषय व्हायला हवा. या पाश्र्वभूमीवर दलित, वंचितविषयक आस्था असणारा सर्व वाचक वर्ग, वंचित विभागाचे सर्व अधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे (एनजीओ) व्यावसायिक समाज कार्यकर्ते, समाजशास्त्र, समाजकार्य विषयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक सर्वांनी हे पुस्तक आरंभापासून ते शेवटापर्यंत वाचले पाहिजे, तर मग समाजाच्या न्याय परीघाबाहेर उपेक्षित, शापित, वंचित गावकुसात पुनःस्थापित होण्याची शक्यता निर्माण होईल. वंचित विकासाचे आकाश निरभ्र व्हायचे तर त्यांच्याप्रती आपल्या संवेदना अधिक तीव्र व क्रियात्मक व्हायला हव्यात.
 हा माझा लेखसंग्रहची पहिली आवृत्ती ज्या समाजभान व सामाजिक कृतज्ञतेने श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूरने व विशेषतः कॉ. गोविंद पानसरे यांनी प्रकाशित केले होते त्यासाठी मजकडे शब्द नाहीत. त्यांच्या ऋणात राहणेच मला आवडेल.
 आता दुसरी आवृत्ती अक्षर दालन, कोल्हापूरचे अधिक आकर्षक रूपात आणून या विषयाबद्दल आस्था व्यक्त केली आहे. त्याबद्दल अमेय जोशींचा मी आणि तमाम वंचित समुदाय कृतज्ञ आहे.


-डॉ. सुनीलकुमार लवटे