पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


जपानमधील मतिमंदांचे संगोपन व पुनर्वसन


 गतवर्षी (१९९६) ‘फाऊंडेशन फॉर दि वेल्फेअर अँड एज्युकेशन ऑफ दि एशियन पीपल' संस्थेच्या निमंत्रणावरून भारत सरकारने जे उच्चस्तरीय शिष्टमंडळ जपानला पाठवले होते त्यात मी होतो. त्याच्या अभ्यास दौ-याचा विषयच मुळी 'Orphanand Fatherless Family' असा होता. प्रथमदर्शनी विचित्र वाटणारा विषय. पण, जपानमधील वेगवेगळ्या सामाजिक संस्था पाहात असताना माझ्या लक्षात आले की तिथे ‘अनाथ' हा शब्द फार व्यापक अर्थाने-निराधार, गरजू, संकटग्रस्त, वंचित, पुनर्वसनक्षम अशा आशयाने वापरला जातो. त्यामुळे अनाथ, निराधारांबरोबरच मतिमंद, अपंग, वृद्ध, अंध, युद्धग्रस्त अशा अनेक घटकांच्या संदर्भात तिथे चालणारे संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन कार्य पाहता आले. सन १९९० ला असेच कार्य फ्रान्स, स्विट्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, लक्झेंबर्ग, बेल्जियम, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशांतूनही मी पाहिले होते.
 जपानमधील मतिमंदांचे संगोपन व पुनर्वसन कार्य हे जवळपास युरोपसारखेच आहे. पण त्यांच्या कार्यपद्धतीत मात्र बदल आहे. युरोपात अनाथ, मतिमंद, वृद्ध, अपंग यांच्या स्वतंत्र संस्था आहेत. जपानने आपल्या कल्याणकारी कार्याची रचना एकात्मिक (Integrated) ठेवली आहे. जपानचा सामाजिक प्रश्न सोडविण्याचा दृष्टिकोन सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी (Wholestic) आहे. त्यामुळे जपानच्या एकाच सामाजिक संस्थेत तुम्हास मतिमंद, वृद्ध, अपंगांचे कार्य केलेले आढळेल. या साच्यामागे असलेल्या साधन संपत्तीचा । अधिकाधिक उपयोग करण्याचे जसे धोरण आहे, तसेच ते कामाची द्विरुक्ती टाळण्याचेही आहे. त्यामुळे विभागामध्ये (Perfectual) एखादीच संस्था असते पण तिथे संस्थात्मक व संस्थाबाह्य सेवा (Institutional and Non Institutional) एकत्रितपणे पुरविल्या जातात. गरजूंना एका छत्राखाली सर्व सेवा पुरविण्याचा त्यांचा प्रयत्न भारतासारख्या गरीब देशाने विनाविलंब आत्मसात करण्याची

वंचित विकास जग आणि आपण/८८