पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मुलाशी ‘बुवाऽभो' चा जो खेळ खेळते, तो त्या मुलाच्या चेह-यावर लक्ष-लक्ष दीप उजाळणारा असतो. ते खळखळते हास्य न लाभलेली अशी आई न मिळणारी, असेल तर खेळात वेळ न मिळणारी (नोकरी करणारी) आई लाभलेली किती बालके या जगात रोज कुढत बालपण कंठत असतात, हे आपल्या लक्षात येत नाही. मुलांना प्रेम, संरक्षण, आरोग्य, सकस आहार, संगोपन, सुविधा, शिक्षण, मनोरंजनादी गोष्टींपोटी कितीतरी बाबींची गरज असते. पण साध्या गोष्ट न मिळणारी लक्षावधी मुले जगात केवळ श्वास घेत वाढतात. त्यांना जीवन कसं म्हणायचे? ते केवळ जगणे असते! जगात ११ दशलक्ष बालके स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत. २३ दशलक्ष घरात संडाससारखी मूलभूत सुविधा नसल्यानं अनेक बालके रोगराईस बळी पडतात. ज्या खेड्यात १० दारूचे गुत्ते असतात, तिथे एखादेही बाल संगोपन केंद्र असत नाही. रुग्णालय असते. पण सेवांची शाश्वती नसते. पाच कोटी बालके दारिद्र्यपिडीत आहेत. एड्ससारखा रोग रोज हजारो बालकांना पोरके करतो. दरवर्षी सुमारे २० ते ४0 लाख महिलांवर त्यांचे नवरे हिंसक हल्ले/अत्याचार करतात. परिणामी, त्यांची अपत्ये भावनिक, मानसिकदृष्ट्या असुरक्षित होतात. गेल्या दशकात युद्धामुळे २० लक्ष मुले मरणोन्मुख पडली. या नि अशा असंख्य आकडेवारीने हा अहवाल भरलेला आहे.
 मुलांसाठी आपण निर्माण करून ठेवलेले जग म्हणजे 'मूल्य विरहित विश्व' होय. मुलांना केली जाणारी शिवीगाळ म्हणजे, त्यांना दिलेल्या सन्मानपूर्वक आयुष्याच्या आश्वासनाची पायमल्लीच होय. गरिबी, रोगराई, हिंसा, भेदाभेद यांचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले चक्र आपण भेदायला हवे. त्यासाठी शैशवावस्थेपासून गुंतवणुकीचे धोरण स्वीकारले पाहिजे. प्रत्येक मुलाला आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळेल, याची ग्वाही द्यायला हवी. नियोजनात तशी तरतूदही करायला हवी. मुलांना उज्ज्वल भविष्य देण्यासारखे उदात्त या जगात दुसरे काही असूच शकत नाही. हे एकदा आपण मान्य केले की, मग गॅबियल मिस्ट्रल मुलांच्या संदर्भात 'Thy name is today' का म्हणतो हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. खलील जिब्राननी म्हटल्याप्रमाणे, “तुम्ही तुमच्या मुलांना सर्व काही द्या, फक्त तुमची स्वप्नं नि विचार देऊ नका. कारण ते ती स्वत:ची' घेऊन आलेली असतात', हे एकदा पक्के झाले की मग आपल्या हाती उरतं ते, त्यांना विकासाची संधी देणारे मोकळे आकाश नि स्वच्छ, सुंदर, निर्वेध, भेदातीत पृथ्वी देणे. ते आपण त्यांना देऊ या! त्यांच्या उज्ज्वल उद्यासाठी!! नव्या निर्मळ जगासाठी!!!

◼◼


वंचित विकास जग आणि आपण/८७