पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

बाल्य सततच्या युद्धसदृश स्थितीमुळे धोक्यात, भारतात दारिद्र्यामुळे, नेपाळमध्ये कुपोषणाचा यक्ष प्रश्न, पेरूमध्ये बालसंगोपनाची अनास्था, जमेकामध्ये अल्पायु आईच्या (१५ ते १९ वर्षे) पोटी जन्मणाच्या नवजात शिशूना वाचवण्याचे आव्हान, मॅसिडोनियात निर्वासितांच्या पुनर्वसनाचे धर्मसंकट, मालदीवमध्ये एड्समुळे पोरक्या झालेल्या बालकांचे संगोपन नि आजार, टर्कीमधले दुर्लक्षित पालकत्व, फ्रान्समध्ये गाँ द ऑर मधील स्थलांतरितांचे प्रश्न व त्यांना मध्यप्रवाहात आणण्याची बिकटता, अमेरिकेतील घराघरांत । होणारे महिला व मुलांवरील अत्याचार.
  या सर्व पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र बालक निधीमार्फत वेगवेगळ्या देशात वेगवेगळे प्रकल्प राबवून तेथील बालकांना ‘सोनेरी बालपण व उज्ज्वल भविष्य' देण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या भारतात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिला व बालकांसाठी ‘समन्वित बाल विकास कार्यक्रम' (ICDS) राबवला जातो. श्रीलंकेत ‘घराघरात सेवा योजनेंतर्गत बालकाचे संगोपन
 आनंदायी वातावरण होईल असे पाहिले जाते. पेरूसारख्या देशात ‘इनिशिएटिव्ह पापा' कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला. त्याचा कित्ता पुढे जॉर्डन, नामिबियासारख्या देशात गिरवला गेला. या योजनेत वडील मुलांचे संगोपन करतात. जेवण, खेळ, शाळेस आणणे-नेणे इ. मधून ‘बाबा' अधिक काळ मुलांच्या संगतीत राहतात. या संदर्भात गतवर्षी इंग्लंडचे पंतप्रधान ‘टोनी ब्लेअर' यांनी घरी बाळ जन्माला आल्यावर त्याच्या सांभाळासाठी चक्क ‘पितृत्व रजा' घेऊन जगासमोर मोठा आदर्श ठेवला. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातला काही वेळ या महत्त्वाच्या कार्यालयीन कामकाजासाठी' (बालसंगोपनासाठी) राखून ठेवला होता. कॅनडामध्ये राबविण्यात येणारा ‘फर्स्ट टीयर' कार्यक्रमही लक्षात घेण्यासारख्या आहे. फिलीपाईन्समध्ये बालकांसाठी केंद्र संपर्क सेवा' चालविली जाते. तिच्याद्वारे संसर्गजन्य रोगांपासून बालकांच्या बचावाची काळजी घेतली जाते. मालदीवमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी ‘माध्यम संस्कृतीचा अनोखा उपक्रम राबविला जातो.
 ही सारी धडपड अशासाठी केली जाते की, जगभर कधी नव्हे तेवढं। बाल्य उपेक्षित राहत आहे. बालपण उपेक्षेची अनेक अंगे आहेत. प्रसूतीपूर्व, प्रसूतीकाळ व प्रसूतीउत्तर अशा तिन्ही स्तरावर मुला-मुलींची विलक्षण आबाळ होते आहे. बाळ जन्माला येण्याच्या क्षणापासून ही आबाळ होत असते. त्यासाठी स्पर्श, हालचाली, रासायनिक प्रक्रिया, भावनांची देवाण-घेवाण सर्व स्तरावर बाल केंद्रित संगोपन साक्षरता रुजवणे महत्त्वाचे असते. आई

वंचित विकास जग आणि आपण/८६