पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


जगातील उपेक्षित बाल्य


 युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड (युनिसेफ) ही आंतरराष्ट्रीय बालकल्याण संस्था प्रतिवर्षी ‘जगातील मुलांची स्थिती' स्पष्ट करणारा अहवाल प्रकाशित करत असते. मीही तपभर तरी हा अहवाल प्रतिवर्षी मनापासून वाचत आलो आहे. तो वाचून मुलांसाठी मला जे काही करता येणे शक्य आहे, ते करत आलो आहे. माझी ही धडपड मुलांचे प्रचंड प्रश्न लक्षात घेता नगण्य आहे खरी. पण मी नुसता विचार करून थांबलो नाही. काही केले याचे समाधान मला लाभते. हा प्रयत्न ‘पावलापुरता प्रकाश जरी असला, तरी मुलांच्या संदर्भात ते 'एक पाऊल पुढे मात्र निश्चित असते. संयुक्त राष्ट्र बालक निधीने या वर्षीचा (२००१) अहवाल ‘बालपण' (शैशव) विषयावर केंद्रित केलाय. तो वाचून कुणाही संवेदनशील माणसाचे हृदय जगातील उपेक्षित बाल्य पाहून, अनुभवून हालल्या, हादरल्याशिवाय राहणार नाही.
 माणसाची सर्वाधिक महत्त्वाची घडण जन्मापासूनच्या पहिल्या तीन वर्षांत होत असते. यालाच शैशवावस्था म्हणतात. दुर्दैवाने जगात मुलांकडे सर्वाधिक दुर्लक्ष होत असेल तर ते याच काळात. जन्मपूर्व स्थितीतही आईची स्थिती ठीक नसेल तर तिला व पर्यायाने तिच्या बाळालाही प्रसूतीपूर्व यातना भोगाव्या लागतात व त्याचे परिणाम बालकाच्या वाढीवर आयुष्यावर होत राहतात. असा जोखमीचा कालखंड सर्व जगभर अज्ञान, गरिबी, अनास्थेमुळे दुर्लक्षिला गेल्यामुळे दरवर्षी ८० लाख मृत बालके जन्माला येतात किंवा जन्मल्यावर लगेच मरण पावतात.
 गरिबी, युद्ध, एड्ससारखे रोग यामुळे जगातले बाल्य असुरक्षित झाले आहे. त्यामुळे कितीतरी महिला व मुले सामाजिक सुरक्षेच्या कवचास मुकलेली आहेत, हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र बालक निधीने बालकांच्या शैशव काळात गुंतवणूक करण्याचे धोरण निश्चित केले आहे. असे दिसून येते की, कर्जबाजारी झालेले देश कर्जफेडीसाठी बालक विकासात काटकसर करतात.

वंचित विकास जग आणि आपण/८४