पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

पाहायला हवे. आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिकांचे ख-या अर्थाने मोहोळ बनले पाहिजे. या संघांनी समाजोपयोगी कामातील आपली भागीदारी वाढवायला हवी. ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर जेव्हा वृद्ध होतात तेव्हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न सर्वाधिक बिकट असतो. त्यांच्या सर्व कल्याणाची योजना करणे अगत्याचे झाले आहे. ज्येष्ठ स्त्रियांचे स्वत:चे म्हणून काही प्रश्न आहेत. निराधार विधवा, त्यांच्या वृद्धावस्थेत हलाखीचे जीवन जगतात. त्यांच्यासाठी संरक्षण केंद्रांची उभारणी व्हायला हवी. अपंग व रोगजर्जर वृद्धांसाठी मृत्यूपर्यंतच्या सन्मानपूर्ण जीवनाची हमी देणारे उपचार व शुश्रूषा केंद्रे विकसित करणे अनिवार्य झाले आहे. निवृत्तीच्या काळातील वाढता उपचार, औषध, शस्त्रक्रिया, अपंगत्व इ. बाबींचा विचार करता निवृत्तीवेतनात यासाठी स्वतंत्र ‘उपचार भत्ता' मिळणे वृद्धांचा हक्क मानणे गरजेचे झाले आहे. वृद्धांसाठी मोफत वैद्यकीय, वैधानिक व विधी सुविधा हा वृद्धांचा हक्क मागण्याची मानसिकता समाजात घर करील तेव्हाच इथे वृद्धांचा स्वर्ग अवतरेल. आज वृद्ध आपल्या आप्तांच्या दयेवर जगत आहेत. वृद्धांची अनुकंपनीय स्थिती दूर करायची तर केवळ या योजनांत विदेशी गुंतवणूक कधी होईल याची वाट पाहात न थांबता आपल्या उपलब्ध अर्थ मनुष्यबळाच्या वापराचे द्रष्टे धोरण अंगीकारले तरी सध्याचे चित्र आपणास आमूलाग्र बदलता येईल. पण त्यासाठी गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची व जागृत, संघटित जनआंदोलनाची.

◼◼


वंचित विकास जग आणि आपण/८३