पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


 हे सारे खरे असले तरी उक्ती नि कृतीमधील अंतर हा या देशातील कल्याणकारी योजनांच्या संदर्भातील कळीचा मुद्दा आहे. स्वातंत्र्याच्या गेल्या ७0 वर्षांचा आपला कार्यपद्धतीविषयक इतिहास असे सांगतो की आपण धोरण जाहीर करतो, पण अंमलबजावणीबाबत फारसे दक्ष राहात नाही. कल्याणकारी कार्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाच्या हाँगकाँग, जपान, थायलंड, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलियासारख्या देशात कल्याणकारी योजना हा कायद्याचा अविभाज्य भाग असतो. शिवाय संबंधित कायदाच अंतर्भूत योजना सुचवतो, शिवाय सेवांचा अपेक्षित दर्जाही सूचित करतो. आपणाकडे कायदा व सेवा या स्वतंत्र, समांतर कार्यरत असतात. परस्पर सहयोग व संपकाच्या यंत्रणेअभावी आपले कायदे आदर्श असतात, पण परिणामकारक अंमलबजावणीच्या अभावी ते कुचकामी ठरताना दिसतात.
 सध्याचे हे चित्र पालटायचे असेल तर ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण योजनांच्या संदर्भात ऑस्ट्रेलिया, जपानसारखे ‘वृद्धांचा स्वर्ग' मानले जाणारे देश आपण प्रतिदर्श (Model) डोळ्यासमोर ठेवायला हवेत. म्हणून तिथे वृद्धासाठी केवळ धोरण कायदे नाही तर योजनांची रेलचेल आहे. जगभर वृद्धांचे काही हक्क मानण्यात आले आहेत. वृद्धावस्थेत गरजे असेल तर रोजगार हमी, सन्मानाने जगण्याचा हक्क, वृद्धावस्थेतील शिक्षणाचा हक्क, भूकबळीपासून मुक्तीचा हक्क, शुद्ध पाणी मिळण्याचा हक्क यांचा त्यात अंतर्भाव आहे. भारतातील ज्येष्ठ कल्याण योजना जगाच्या विद्यमान योजनांचा विचार करता जुजबीच म्हणायला हव्यात. यात सुधारणा व वाढीस भरपूर वाव आहे. आपल्याकडे निवृत्तीच्या तारखेस फाशीच्या तारखेचे रूप आले आहे. ते दूर व्हायचं तर क्रमशः निवृत्तीचे धोरण अंगीकारले पाहिजे. निवृत्तीच्या स्पर्शकाळात कार्यभार कमी करणे, रजा वाढवणे, आरोग्य सुविधा वाढविणे, प्रवास संधी उपलब्ध करून देणे, मनोरंजन सुविधांचे जाळे तयार करणे, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधांचे एकछत्री केंद्र निर्माण करणे. वृद्धाश्रम केवळ भोजन व निवासाचे केंद्र न होता ते आयुर्मान वाढविणारे संजीवन केंद्र म्हणून विकसित करायला हवे. वृद्धांच्या आवश्यकता लक्षात घेऊन वास्तुनिर्मितीचे धोरण स्वीकारले पाहिजे. वृद्धावस्था विज्ञानाच्या (जराशास्त्र) विकासास प्राधान्य द्यायला हवे.
 असे झाले तर भारत वृद्धाच्या संदर्भात ‘अनुकंपनीय राष्ट्र न राहता ‘अनुकरणीय राष्ट्र म्हणून ओळखले जाईल. सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर बालकानंतर पहिला हक्क पोहोचणारा ‘समाज वर्ग' म्हणून ज्येष्ठ नागरिकांकडे

वंचित विकास जग आणि आपण/८२