पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


भारत : वृद्धांचे अनुकंपनीय राष्ट्र


 खलील जिब्रान हा सिरियातील जगप्रसिद्ध कवी. त्यांनी 'प्रोफेट' नावाचे काव्य लिहिले आहे. या काव्याच्या परिशिष्टात त्यानं ‘अनुकंपनीय राष्ट्र कोणास म्हणावे ते अधोरेखित केले आहे. वृद्धांच्या कल्याणाच्या संदर्भात भारताचा विचार करता खलील जिब्रानने निर्धारित केलेली लक्षणे आपल्या देशास तंतोतंत लागू पडतात. 'श्रद्धेनी परिपूर्ण परंतु धर्म, कर्तव्यशून्य राष्ट्र अनुकंपनीय समजावे', असे जिब्रान म्हणतो. आपल्या देशात वृद्धांबद्दल असीम श्रद्धा आहे खरी. पण कर्तव्याच्या पातळीवर शासन, समाज, घर सर्व पाळीवर लागलेली घसरण या देशास दयनीय ठरवते खरी. स्वनिर्मित वस्तूंचा विनियोग न करणारे राष्ट्र अनुकंपनीय असते. या देशातील वृद्ध काही आयात झालेले नाहीत. या वृद्धांच्या अनुभव, कार्य, ज्ञान, कौशल्य, शक्तीच्या विनियोगाचे कोणतेही नियोजन आपल्या देशाकडे नाही. परिणामी ६० ते ७० वयोगटातील शारीरिक व मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न अशा १०% कार्यक्षम वृद्धांच्या (सुमारे १० लक्ष) वापराची योजना नसल्याने अनुभवी व कुशल जनशक्तीचा अपव्यय होतो आहे. स्वेच्छानिवृत्ती योजनांमुळे कार्यक्षम वृद्धसंख्येच्या प्रमाणात या दशकात मोठी वाढ अपेक्षित आहे. रोज एकेक कल्याणकारी योजना रद्द करून सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांतून अंग झटकणारे सरकार स्वत:ला 'कल्याणकारी कसे म्हणू शकते? अशा ‘भेकड’ राजकारण्यांची ‘वीर पुरुष' म्हणून संभावना करणारे राष्ट्र अनुकंपनीयच असते. बढाया मारणारे, स्वकेंद्रित, मुत्सद्दी, गारूडी तत्त्वज्ञान असणारे, ठिगळे लावणारे, भ्रष्ट आचरण करणारे नेतृत्व ज्या देशास लाभते ते राष्ट्र केवळ अनुकंपनीय. वृद्ध कल्याणासंदर्भात विचार करायचा झाला तर या देशाचे सरकार ‘कथनी व 'करनी' यातील अंतर रोज भूमितीच्या पटीने वाढणारेच दिसून येते, म्हणूनही ते अनुकंपनीय ठरते.

वंचित विकास जग आणि आपण/७९