पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


९. पाठपुरावा


 देखभालीइतकाच अपंग पुनर्वसन कार्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे पाठपुरावा (follow up) होय. ज्या उद्देशाने अपंगांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, व्यवसाय सुविधा दिल्या त्या कितपत सफल झाल्य याचे मूल्यांकन करून अपेक्षित उद्दिष्टांप्रत नेत राहण्यास मदत करणे म्हणजे पाठपुरावा. हा केवळ पत्रव्यवहाराचा भाग नसून त्यात चर्चा, मार्गदर्शन, समुपदेशन, मदत इत्यादी गोष्टीही अंतर्भूत होत असतात.
 अपंग, पुनर्वसन कार्याची वरील दिशा लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यात शासकीय व स्वयंसेवी संस्था/योजनांच्या रूपाने काय सुविधा उपलब्ध आहेत याचा विचार केल्यास या कार्याची दशा व दिशा स्पष्ट होईल.
 राज्यातील अंध, मूक, कर्णबधिर, अस्थिव्यंग इत्यादी अपंगांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन कार्य करणाच्या संस्था प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहेत - शासकीय व स्वयंसेवी. शिवाय प्रासंगिक व नैमित्तिक साहाय्य करणारी मंडळे ट्रस्ट, व्यक्तीही आहेत. यातील बरेचसे काम हे शासकीय व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालते. शासन स्वयंसेवी संस्थांना योजनानिहाय अनुदान देत असते. अंध, मूक, बधिर, अस्थिव्यंग, मनोदुर्बल, कुष्ठरोग मुक्त इ. अपंग व्यक्ती, मुले-मुली यासाठी आपल्या राज्यात ज्या योजना व सुविधा उपलब्ध आहे.त्यांची वर्गवारी केल्यास त्या खालील रूपात दिसून येतात
१. अपंगांच्या शिक्षण, प्रशिक्षण व उपचारार्थ निवासी वसतिगृहे,
२. स्वयंसेवी संस्थांना अनुदान योजना,
३. कुष्ठरोग मुक्तांच्या पुनर्वसनाची केंद्रे,
४. वृद्धाश्रम,
५. अपंगांच्या व्यावसायिक साहाय्यासाठी वित्त योजना,
६. अपंगांसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्र,
७. अपंगांसाठी मनोरंजन व सांस्कृतिक केंद्र,
८. अपंगांसाठी शिष्यवृत्ती योजना,
९. अपंगांसाठी उपकरणांची मदत,
१०. अपंगांसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, ११. पुरस्कार.

वंचित विकास जग आणि आपण/७५